बाजार समितीच्या १२६ कर्मचाऱ्यांना नोटीस

सोलापूर : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये संचालक विरुद्ध सहकार खात्याचा वाद शिगेला पोहोचला असताना प्रशासक कुंदन भोळे यांनी १२६ कर्मचाऱ्यांना सप्टेंबर २०१७ रोजी कारणे दाखवा नोटीस जारी केली आहे. या नोटिशीत असे म्हटले आहे की, २००४ सालापासून या १२६ जणांना पणन संचालक आणि अन्य कोणत्याच खात्याची परवानगी नसताना आपणास कामावर का ठेवावे? आपणास पगार देत अन्य सुविधा का द्याव्यात? अशा आशयाचा मजकूर या नोटिसीमध्ये आहे.

बाजार समितीमधील कारकून, सुरक्षा रक्षक, वाहन चालक, शिपाई यांच्यासह अन्य पदांवर असणाऱ्यांचा ही यात समावेश आहे. संचालक विरुद्ध सहकार खात्यातील वादाचा बडगा कर्मचाऱ्यांवरही आल्याने कर्मचारी वर्ग अस्वस्थ झाला आहे. भोळे यांनी पाठवलेल्या नोटिसीत म्हटले आहे की, सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आस्थापनेवरील या नेमणुकीस अद्याप जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था सोलापूर यांच्याकडून मान्यता मिळालेली नाही, तरी आपणास नियमबाह्य देण्यात येणारी पगार वाढ इतर सवलती रद्द का करू नये याबाबत खुलासा करावा.

या नोटिसीप्रमाणे क्रमांक एक ते २६ या कर्मचाऱ्यांची नेमणूक १२ फेब्रुवारी २००४ रोजी असून पुढील ५५ पर्यंतचे कर्मचारी यांना २७ जुलै २००४ पासून सहा महिन्याच्या प्रोबेशनरीवर नेमणूक केली होती. यासंदर्भात औद्योगिक न्यायालय सोलापूर येथे २००५ साली दावे दाखल करण्यात आले होते.

या दाव्यात तडजोडी प्रमाणे न्यायालयाने १२ जानेवारी २०१० रोजी आदेश होत निकाली काढण्यात आले होते. त्याप्रमाणे सदरच्या कर्मचाऱ्यांच्या कायम नेमणुकीस मंजुरी मिळणे बाबत प्रस्ताव २६ जुलै २०११ अन्वये जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था सोलापूर यांच्याकडे सादर केला होता. प्रशासकाच्या या नोटिसीनंतर कर्मचाऱ्यांनी कायदेशीर लढाईची तयारी सुरू केली आहे. यापूर्वीच संचालक मंडळाची लढाई सुरू होती. आता नव्याने कर्मचारी सहभागी झाले आहेत.

You might also like
Comments
Loading...