प्रशासन विभागाने पाठवलेली नोट “ओव्हररूल” करण्यात माझा हातखंडा- शरद पवार

शरद पवार

पुणे: राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ज्येष्ठ साहित्यिक, पत्रकार अरुण साधू यांच्या विषयीच्या आठवणींना उजाळा दिला. अरुण साधू यांचे लिखाण मराठी वाचकांच्या अंतःकरणाला भिडणारे होते. त्यांनी मराठी साहित्याचा दर्जा कसा सर्वोत्तम राहील, याची काळजी घेतली, असेही पवारांनी नमूद केले.

अरुण साधू यांच्या स्मृत्यर्थ विज्ञानापासून सामाजिक विषयापर्यंत संशोधन करणाऱ्या विद्यार्थी, पत्रकारांना आर्थिक पाठ्यवृत्ती देण्यात येणार आहे. या योजनेच्या घोषणेसाठी ग्रंथाली, अरुण साधू कुटुंबीय व मित्रमंडळ, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा संज्ञापन व वृत्तपत्रविद्या विभागातर्फे आयोजित कार्यक्रमात शरद पवार बोलत होते.

शरद पवार म्हणाले, “मी मुख्यमंत्री असताना सिंहासन चित्रपटाचे चित्रीकरण करण्यात आले. त्यावेळी कथेच्या मागणीनुसार मुख्यमंत्री कार्यालय आणि निवासस्थान चित्रीकरणासाठी उपलब्ध करून देण्याची विनंती दिग्दर्शक जब्बार पटेल यांनी केली होती. त्यावेळी अशा प्रकारे चित्रपटासाठी मुख्यमंत्री कार्यालय उपलब्ध करून देणे अयोग्य असल्याची टिप्पणी सामान्य प्रशासन विभागाने पाठवली होती. मात्र अशा नोट ”ओव्हररूल” करण्यात माझा हातखंडा असल्याने तसे करत मी मुख्यमंत्री कार्यालय व निवासस्थान चित्रीकरणासाठी उपलब्ध करून दिले अन् त्यातून अप्रतिम कलाकृती निर्माण झाली” यावेळी, खासदार कुमार केतकर, डॉ उज्ज्वला बर्वे, अरुणा साधू, अश्विनी दरेकर उपस्थित होते.