नोटबंदीची संसदीय समितीद्वारे चौकशी करा – पृथ्वीराज चव्हाण

मुंबई : वस्तू व सेवा कर व त्या आधी केलेल्या नोट बंदीच्या निर्णयामुळे देशभरातील व्यापारी वर्गात नाराजी आहे. या निर्णयांमुळे सर्वसामान्यांनाही मोठा त्रास सहन करावा लागला. एकूणच व्यवसायासह अर्थव्यवस्थेवर याचा परिणाम झाला. यासाठी नोट बंदीची संसदीय समितीद्वारे चौकशी करावी, अशी मागणी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज येथे केली. त्यांनी येथील एका कार्यक्रमात व्यापा-यांशी संवाद साधला.

आ. चव्हाण म्हणाले की, जीएसटी आणि नोटबंदीमुळे अनेक जण बेरोजगार झाले. अर्थव्यवस्था २ टक्के खाली आली. यावर तोडगा काढण्याचा कधीही प्रयत्न झाला नाही. सरकार कोणाचेही ऐकत नाही. याबद्दल व्यापारी वर्गाने विचार करण्याची गरज आहे. सरकारवर दबाव आणायची गरज आहे. नोटबंदीचे खरे कारण, खरा उद्देश लोकांसमोर आणायला हवा, असेही आ. चव्हाण म्हणाले.

नोटबंदी करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले होते की, नोटबंदीचा मूळ उद्देश काळा पैसा बाहेर काढणे, भ्रष्टाचार कमी करणे, दहशतवादाचे निर्मूलन करणे हा आहे. नंतर काही दिवसांनी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली म्हणाले की, नोटबंदीचा मागचा उद्देश संपूर्ण देशात डिजिटलायजेशन करणे हा होता. आम्हाला कॅशलेस अर्थव्यवस्था करायची आहे. आता पंतप्रधान मोदी यांनी नोटबंदीमागचा उद्देश सांगितला होता तो खरा की अरुण जेटली म्हणाले ते खरे. नोटबंदीचा निर्णय अमेरिकी क्रेडिट कार्ड कंपन्या, वित्तीय कंपन्यांच्या दबावाखाली, त्यांना लाभ मिळवून देण्यासाठी घेतला गेला आहे का, याची चौकशी होणे फार गरजेचे आहे. त्यामुळे संसदीय समितीद्वारे या सर्वांची चौकशी करावी, अशी मागणी आ. चव्हाण यांनी केली.

You might also like
Comments
Loading...