उद्यापासून बँकांमध्ये जुन्या नोटा नाही मिळणार बदलून

500 आणि 1000च्या जुन्या नोटा उद्यापासून बँकेतून बदलून मिळणार नाहीत. मात्र या जुन्या नोटा बँकेत जमा करता येणार आहेत. जुन्या नोटा पेट्रोल पंप आणि रुग्णालयातही स्वीकारण्यात येणार आहेत, अशी माहिती केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी दिली आहे.

  • दरम्यान हजार रुपयांची जुनी नोट सरकारनं ज्या ठिकाणी 15 डिसेंबरपर्यंत सवलत दिली आहे, तिथेही चालणार नाही. ती बँकेतच जमा करावी लागणार आहे. 500 रुपयांच्या जुन्या नोटा प्री-पेड मोबाईल रिचार्ज करण्यासाठी स्वीकारण्याची मुभा दिली आहे. सहकारी ग्राहक भांडारातून एकाच वेळी 5000 रुपयांपर्यंतची खरेदी करता येणार आहे, अशी माहिती केंद्रीय अर्थ मंत्रालयानं दिली आहे.
  • 8 नोव्हेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 500 आणि 1000 रुपयांच्या नोटाबंदीचा निर्णय जाहीर केला. त्यानंतर बँक आणि पोस्टाच्या समोर जुन्या नोटा बदलून घेण्यासाठी लांबच लांब रांगा लागल्या होत्या. या रांगा कमी होण्याचं नाव घेत नव्हत्या. अखेर मोदी सरकारनं नोटा बदलून देण्याची मुदतच संपुष्टात आणली आहे. त्यामुळे आता फक्त नोटा बँकेत जमा कराव्या लागणार आहेत.