दीपक मानकर अजित पवारांसाठीही ‘नॉट रीचेबल’

पुणे: जितेंद्र जगताप आत्महत्या प्रकरणी राष्ट्रवादीचे नगरसेवक दीपक मानकर यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. हि ‘घटना घडल्यावर दीपक मानकरांना फोन लावला, पण त्यांचा फोन मलाही ‘नॉट रीचेबल’ आला’, असे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार यांनी सांगितले. ते पुण्यात पत्रकारांसोबत बोलत होते.

अजित पवार म्हणाले, सदर घटनेप्रकरणी अंकुश काकडेंनी मला सांगितलं, त्यावर मी दीपक मानकरांना फोन लावला, पण त्यांचा फोन मलाही ‘नॉट रीचेबल’ आला. मात्र, अशा प्रकारे एक व्यक्ती त्यांना आत्महत्या करण्याची धमकी देत असल्याचा अर्ज त्यांनी आधीच दिला होता. त्यामुळे जी काही चौकशी होईल त्याला कोणीही असो त्याने समोर जाणं गरजेचं आहे. असे पवार म्हणाले.

नेमकं काय आहे प्रकरण ?

जितेंद्र जगताप यांच्या ताब्यात रास्ता पेठेत समर्थ पोलिस ठाण्यासमोर असलेली 481 रास्ता पेठ येथील जमीन आहे. या जमीनीबाबत दिपक मानकर व त्यांचे व्यावसायिक भागीदार सुधीर कर्नाटकी यांच्या ताब्यात असलेल्या व देखभाल करत असलेल्या या जमीनीबाबत मागील दहा ते बारा वर्षांपासून व्यवहार सुरु आहेत. दरम्यान या जमिनीचा ताबा मिळावा म्हणून जगताप यांच्यासोबत मानकर व कर्नाटकी यांच्यात दोन तीन वेळा बैठक झाली. त्यांना ही जागा ताब्यात देण्यासाठी व कोऱ्या कागदावर सह्या करण्यासाठी त्यांच्यावर दबाव आणला जात होता. मात्र या जमीनीच्या देखभालीसंदर्भात आजपर्यंत केलेल्या मेहनतीचा व देखभालीचा योग्य मोबदला दिल्यास आपण या कागदपत्रांवर सह्या करू असे जगताप यांनी सांगितले होते.

त्यानंतर शुक्रवारी जगताप यांनी जयेश जगताप यांना या बैठकांतील सर्व हकिकत सांगितली. तसेच या जागेचा ताबा तू भविष्यात दिला नाही तर कागदांवर सह्या करून कसा ताबा घ्यायचा आहे हे मला माहित आहे. यात माझा लौकीक आहे. तू घरी जाऊन विचार कर असे धमकावले. त्यानंतर शनिवारी सकाळी जगताप नेहमीप्रमाणे त्यांच्या रास्ता पेठेतील या जागेवर गेल्यावर तेथे विनोद भोळे व इतर सहा ते सात जण तेथे आले. त्यांच्यात तेथे बोलणे झाले. त्यामुळे ते घाबरलेल्या स्थितीत बाहेर आले. काही कामानिमित्त ते तेथून निघून गेले. त्यानंतर त्यांनी घोरपडी येथे आत्महत्या केली. त्यांच्यासोबत गेलेल्या रिक्षाचालकाजवळ त्यांनी लखोटा दिला होता. तो पाहिला त्यावेळी त्यात दिपक मानकर व सुधीर कर्नाटकी व फोटीतील व्यक्तींमुळे मी आत्महत्या करत असल्याचे त्यात लिहिले होते. असे फिर्यादीत म्हटले आहे.