ऑक्सिजन अभावी रुग्णांचा मृत्यू नाहीच, मग ‘या’ कारणांनी मृत्यू झाला; प्रियांका गांधींची टीका

priyanka gandhi

नवी दिल्ली : गेल्या वर्षीपासून कोरोनाने देशभरात कहर माजवला आहे. भारताला कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने मोठा फटका बसला असून सर्वाधिक रुग्णांची या काळात नोंद करण्यात आली, तर लाखो हजारो लोकांना आपला प्राण गमवावा लागला आहे. दुसऱ्या लाटेत आरोग्य व्यवस्था कोलमडल्याच समोर आलं होतं. रुग्णालयांमध्ये बेड्स, औषधे, ऑक्सिजन यांचा मोठा तुटवडा जाणवला होता. यामुळे अनेक रुग्णांना आपला जीव गमवावा लागला.

हा केंद्र सरकारचा हलगर्जीपणा असल्याचं म्हणत विरोधकांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला होता. तर, सर्वोच्च न्यायालयाने देखील केंद्र सरकारला झापले होते. आता, केंद्र सरकारने याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ऑक्सिजन अभावी मृत्यू झाले नसल्याची आश्चर्यजनक माहिती आरोग्य मंत्रालयाने राज्यसभेत दिली आहे. सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश हे कोरोनाच्या काळातील मार्गदर्शक सुचनाप्रमाणे मृत्युची आकडेवारी केंद्र सरकारला सादर करतात. या आकडेवारीनुसार ऑक्सिजन अभावी मृत्यू झालेले नाहीत, अशी माहिती केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांनी राज्यसभेत दिली आहे.

या माहितीवर आता काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी टीकास्त्र सोडलं आहे. ‘ऑक्सिजन अभावी कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला नाही असं केंद्र सरकार म्हणतंय. मग रुग्णांचा मृत्यू खालील कारणांनी झाला – ऑक्सिजनची निर्यात केंद्र सरकारने ७००% पर्यंत वाढवली. या रुग्णांचा मृत्यू झाला कारण केंद्र सरकारने ऑक्सिजनची वाहतूक करण्यासाठी टँकर ची व्यवस्था केली नाही. एंपावर्ड ग्रुप आणि संसदीय समितीच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष करून ऑक्सिजनच्या उपलब्धतेची व्यवस्था केली नाही. रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन प्लांट उपलब्ध करून देण्याची व्यवस्था नाही केली,’ अशी टीका प्रियांका गांधी यांनी केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

IMP