मुंबईची पुन्हा झाली तुंबई : भाजपच नव्हे तर आता कॉंग्रेसने देखील पालिकेला झापलं

bhai jagtap

मुंबई : मुंबईसह उपनगरांमध्ये काल पावसाने जोरदार हजेरी लावली. यामुळे, मुंबईतील सखल भागांसह उपनगरांमध्ये देखील अनेक भागांमध्ये सकाळपासूनच मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने पालिकेचा भोंगळ कारभार समोर आला आहे.

दरम्यान तब्बल १०४ टक्के नालेसफाई झाल्याचा दावा मुंबई महापालिकेने केला होता. मात्र, मान्सूनच्या पहिल्या दोन दिवसातच या दाव्यावर पाणी फेरले आहे.या निमित्ताने सेनेवर टीका करण्याची विरोधकांना संधी मिळाली. भाजप नेत्यांनी महापालिकेत सत्तेत असलेल्या शिवसेनेसह राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल केला आहे.भाजप नेत्या चित्रा वाघ,आशिष शेलार,अतुल भातखळकर यांच्यासह अनेक नेत्यांनी सेनेवर टीका केली आहे.

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी सायन सर्कल आणि हिंदमाता परिसरात गुडघ्याभर पाण्यात उतरून परिस्थितीची पाहणी केली. यावेळी त्यांनी मुंबईच्या पाणी तुंबण्याला जबाबदार कोण ? असा सवाल केला आहे. ‘फडणवीस सरकार राज्यात सत्तेत असताना शिवसेना नेते अनिल परब यांनी मुंबईत पाणी तुंबण्याला मुख्यमंत्री जबाबदार असल्याचं म्हटलं होतं. त्यामुळे आता मुंबईत पाणी तुंबण्याला जबाबदार कोण ? मुख्यमंत्री कि महापालिका ? हाय-टाइड आणि अति पावसाने पाणी तुंबल्याचं सांगितलं जातंय. मात्र, मुंबईसाठी हे नवीन नाही. प्रकल्प अपूर्ण असल्याने मुंबईकरांना या गैरसोयीला सामोरं जावं लागतंय. त्यामुळे आता तरी तुंबलेल्या पाण्याचा निचरा होईल अशी व्यवस्था तात्काळ महापालिकेने करावी,’ अशी मागणी देखील प्रवीण दरेकर यांनी केली आहे.

दरम्यान, मुख्य विरोधीपक्ष असणाऱ्या भाजप नेत्यांनी टीका केली यात विशेष असे काही नाही मात्र चक्क महाविकास आघाडीतील घटक असलेल्या कॉंग्रेसने देखील पालिकेच्या कारभारावर निशाणा साधला आहे. नालेसफाईची कामे २५% सुद्धा झाले नाही. मी आठवड्यापूर्वीच यासंदर्भात बीएमसी ला इशारा दिला होता आणि ते खरे ठरले! अवघ्या एका दिवसाच्या मुसळधार पावसामुळे मुंबईतील रस्ते पुन्हा बुडाले. हे किती वर्ष आपण सहन करणार आहोत? असा थेट सवाल उपस्थित करत कॉंग्रेस नेते भाई जगताप यांनी पालिकेला झापलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

IMP