भाजपचा नव्हे साम, दाम, दंड, भेदाचा विजय- अशोक चव्हाण

टीम महाराष्ट्र देशा : राज्यपातळीवर भारतीय जनता पक्षाने गेली चार वर्ष स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये नैतिकता बासनात गुंडाळून ठेवण्याची प्रक्रिया कायम ठेवली असून दुर्मागाने मिळवलेले धन म्हणजेच दुर्योधन आणि अनैतिक पद्धतीने चालवलेले शासन म्हणजेच दु:शासन याच्या माध्यमातून लोकशाहीचे वस्त्रहरण सातत्याने केले जात आहे. धुळे महानगरपालिकेतील विजय हा भाजपचा नसून साम, दाम, दंड भेदाचा विजय आहे. अशी घणाघाती टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केली आहे.
यासंदर्भात बोलताना खा. चव्हाण म्हणाले की,पालघर लोकसभा निवडणुकीत स्वमुखातूनच मुख्यमंत्र्यांनी भाजपची रणनिती स्पष्ट केलेली आहे. तसेच भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी अधिकृतपणे लक्ष्मी दर्शनास मान्यता दिलेली आहे. गुंडाना पक्ष प्रवेश इतर पक्षातील लोकांना अमिषे दाखवून, भिती दाखवून फोडणे, पैशाचा खुलेआम वापर आणि निवडणूक यंत्रणेला धाब्यावर बसवणे. या सर्व गैर प्रकारातूनच विजयाचा फॉर्म्युला भाजपने तयार केला आहे. दोन्ही महापालिका क्षेत्रात काँग्रेस प्रमुख पक्ष नाही. या दोन्ही शहरातील विधानसभा मतदारसंघ काँग्रेस पक्षाने गेल्या पंधरा वर्षापासून आघाडीतील मित्र पक्षासाठी सोडलेले आहेत. त्यामुळे त्या ठिकाणी काँग्रेसची ताकद मर्यादीत आहे. असे असले तरीही काँग्रेस उमेदवारांनी व कार्यकर्त्यांनी भाजपच्या धनशक्तीचा निकराने विरोध केला आहे. येत्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत भाजपच्या या कौरवनीतीचा पाडाव जनताच करेल, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.
You might also like
Comments
Loading...