कोल्हापुरात महापुराचा एक थेंबही महामार्गावर येणार नाही; गडकरींचा शब्द

कोल्हापुरात महापुराचा एक थेंबही महामार्गावर येणार नाही; गडकरींचा शब्द

nitin gadkari

कराड : जुलै महिन्यात कोल्हापूरसह सांगली, साताऱ्यामध्ये मुसळधार पावसाने थैमान घातले होते. या जिल्ह्यांमध्ह्ये झालेल्या रेकॉर्डब्रेक पावसामुळे २०१९ पेक्षाही अधिक गंभीर स्थिती निर्माण झाली होती. कोल्हापूरमध्ये शहरासह ग्रामीण भागातील बहुतांश भाग हा पुराच्या पाण्याखाली गेला होता. पूरामुळे राज्यासह कर्नाटक आणि गोव्यासाठी महत्वाचा असणारा पुणे-बंगळुरू महामार्ग हा बंद होतो.

यंदा शिरोली भागात महामार्गावर तब्बल १३ फुटांहून अधिक पाणी आल्याने वाहतूक बंद करण्यात आली होती. यामुळे अत्यावश्यक मदत पुरवण्यात देखील अडथळा निर्माण झाला होता तर हजारो वाहने महामार्गावर अडकली होती. कोल्हापूरला पश्चिम महाराष्ट्राशी जोडणारे इतर मार्ग देखील बंद होतात. महत्वाचा पुणे-बेंगळुरू महामार्ग कोल्हापूर जिल्ह्यातून जात असला तरी महामार्गावर पाणी येऊन वाहतूक ठप्प होत असते. आता या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी महामार्गावर पाणी येणाऱ्या भागात उड्डाणपूल उभारण्यासह अधिकाऱ्यांना महत्वाच्या सूचना दिल्या आहेत.

पुणे-बंगळुरू महामार्गासाठी तब्बल 40 हजार कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे. यावेळी कोल्हापुरात महापुराचा एक थेंब महामार्गावर येणार नाही याची काळजी घ्या, अशा सूचना नितीन गडकरी यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. कराड येथील सभेत बोलताना गडकरी म्हणाले, पुणे-बंगळुरू महामार्ग यापुढे कधीच महापुराच्या पाण्यात जाणार नाही याची खात्री देतो. तसेच, कोल्हापूर-सांगली या रस्त्याचे पुढच्या सहा महिन्यात भूमिपूजन करून काम सुरू करु, असे आश्वासनही गडकरींनी दिलंय.

महत्त्वाच्या बातम्या