fbpx

उत्तर मुंबईतून उर्मिला मातोंडकरच तिकीट निश्चित, आज घेणार राहुल गांधींची भेट

टीम महाराष्ट्र देशा : मराठी सिनेसृष्टीतली आघाडीची अभिनेत्री उर्मिला मातोंडकर आज दुपारी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची भेट घेणार आहे. उर्मिला आज कॉंग्रेसमध्ये प्रवेश करणार असून तिला उत्तर मुंबईतून लोकसभा तिकीट जवळपास निश्चित झाले आहे.

दरम्यान, येत्या लोकसभा निवडणुकीमध्ये बड्या नेत्यांन बरोबरच सिने-सृष्टीमधील कलाकारांना विशेष महत्व प्राप्त झाले आहे. अनेक सिने-कलाकार यंदाच्या लोकसभा निवडणुकीच्या मोसमात राजकारणात सक्रीय होताना दिसत आहेत. त्याचप्रमाणे अभिनेत्री उर्मिला मातोंडकर काँग्रेसच्या बाजूनं मुंबईतून निवडणूक लढवणार आहे.

यंदाच्या निवडणुकीत कॉंग्रेस पक्ष अभिनेत्यांच्या प्रसिद्धीचे परिवर्तन मतांमध्ये करून घेणार आहे. उत्तर मुंबई लोकसभा मतदार संघात कॉंग्रेस उर्मिला मातोंडकर यांना उमेदवारी देवून भाजपचे गोपाळ शेट्टी यांना तगडे आव्हान उभे करणार आहे.

उत्तर मुंबईत भाजपचे गोपाळ शेट्टी हे धडाडीचे उमेदवार असल्याने त्यांच्याविरोधात कोणाला उमेदवारी द्यायची हा प्रश्न कॉंग्रेसला पडला होता. पण आता उर्मिलाला उमेदवारी देण्याचा विचार काँग्रेस करत आहे. याआधी काँग्रेसकडून याठिकाणी आसावरी जोशी, शिल्पा शिंदे यांचीही नावं देखील चर्चेत होते. पण अखेर उर्मिला मातोंडकर यांनी बाजी मारल्याच दिसत आहे.