fbpx

‘असा’ ओळखता येणार खाण्यासाठी अयोग्य असलेला बर्फ

मुंबई – दूषित बर्फ किंवा खाण्यासाठी अयोग्य असलेला बर्फ अनेक ठिकाणी सर्रास पेयांमध्ये वापरला जातो. त्यामुळे अनेक दुष्परिणाम होण्याची शक्यता असते. मात्र आता खाण्यासाठी वापरण्यास अयोग्य बर्फ ओळखणे सोपे होणार आहे.

दूषित बर्फावर उपाय म्हणून प्रशासनाने खाण्यासाठी अयोग्य असलेल्या बर्फाचा रंगच बदलण्याचा निर्णय घेतला आहे. यापुढे खाण्यास अयोग्य असलेल्या म्हणजेच अखाद्य बर्फाला निळा रंग देण्यात येणार आहे.अखाद्य बर्फ थंड पेयात वापरला जाऊ नये, किंवा तो वापरला असल्यास तातडीने लक्षात यावं, हा त्यामागचा हेतू आहे. एक जूनपासून नव्या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे.

राज्याच्या अन्न आणि औषध प्रशासन विभागाने औद्योगिक बर्फ आणि खाद्य बर्फ वेगळा असावा यासाठी बर्फाच्या उत्पादना संदर्भातील अधिसूचना काढली होती. याबाबत विधानसभेच्या दोन्ही सभागृहात निवेदन सादर करण्यात आले होते. या पॅटर्नला केंद्रानेही मंजुरी दिली असून देशात सर्वच राज्यांना हा नियम लागू असणार आहे.

रस्त्यावर फेरीवाल्यांकडे असलेल्या थंड पेयांमधील बर्फाचे नमुने दूषित आढळल्यानंतर, अन्न आणि औषध प्रशासनान कडक पावलं उचलली होती. अन्न आणि औषध प्रशासन मंत्री गिरीश बापट यांनी याबाबत पाठपुरावा केला होता.