Nokia- नोकियाचे तीन स्मार्टफोन भारतात दाखल

नोकियाने आपले नोकिया ३, नोकिया ५ आणि नोकिया ६ हे तीन अँड्रॉईड प्रणालीवर चालणारे स्मार्टफोन भारतीय बाजारपेठेत सादर केले आहेत.

नोकियाने या वर्षाच्या फेब्रुवारी महिन्यात बार्सिलोना येथील ‘मोबाईल वर्ल्ड काँग्रेस’मध्ये नोकिया ३, नोकिया ५ आणि नोकिया ६ हे तीन स्मार्टफोन लाँच केले होते. आता हे तिन्ही मॉडेल्स भारतीय ग्राहकांसाठी सादर करण्यात आल्याचे नोकियाची मालकी असणार्‍या एचएमडी ग्लोबल कंपनीने जाहीर केले आहे. यातील नोकिया ६ या मॉडेलमध्ये ५.५ इंच आकारमानाचा आणि फुल एचडी क्षमतेचा डिस्प्ले असेल. यात क्वॉलकॉमचा स्नॅपड्रॅगन ४३० प्रोसेसर आहे. याची रॅम चार जीबी तर इनबिल्ट स्टोअरेज ६४ जीबी असून ते मायक्रो-एसडी कार्डच्या मदतीने १२८ जीबीपर्यंत वाढविण्याची सुविधा दिलेली आहे. यातील मुख्य कॅमेरा १६ ते सेल्फीसाठी ८ मेगापिक्सल्सचा कॅमेरा दिलेला आहे. हे मॉडेल अँड्रॉईडच्या नोगट या प्रणालीवर चालणारे असून यात ३००० मिलीअँपिअर क्षमतेची बॅटरी प्रदान करण्यात आलेली आहे. हे तिन्ही स्मार्टफोनमधील सर्वात उत्तम फिचर्स असणारे मॉडेल आहे.

नोकिया ५ या मॉडेलमध्ये ५.२ इंच आकारमानाचा आणि १२८० बाय ७२० पिक्सल्स म्हणजेच एचडी क्षमतेचा डिस्प्ले असेल. यात क्वॉलकॉमचा स्नॅपड्रॅगन ४३० प्रोसेसर देण्यात आलेला आहे. याची रॅम दोन जीबी आणि इनबिल्ट स्टोअरेज १६ जीबी असून ते मायक्रो-एसडी कार्डच्या मदतीने १२८ जीबीपर्यंत वाढविण्याची सुविधा असेल. यात १३ आणि ८ मेगापिक्सल्स क्षमतांचे कॅमेरे प्रदान करण्यात आले आहेत. तर यातील बॅटरी ३००० मिलीअँपिअर क्षमतेची असेल.

नोकिया ३ हे मालिकेतील सर्वात स्वस्त मॉडेल आहे. यात पाच इंच आकारमानाचा आणि एचडी क्षमतेचा डिस्प्ले असेल. यात मीडियाटेक ६७३७ प्रोसेसर आहे. याची रॅम दोन जीबी आणि अंतर्गत स्टोअरेज १६ जीबी असून ते मायक्रो-एसडी कार्डच्या मदतीने १२८ जीबीपर्यंत वाढविण्याची सुविधा आहे. यातील मुख्य आणि फ्रंट कॅमेरे हे प्रत्येकी ८ मेगापिक्सल्स क्षमतांचे आहेत. तर यातील बॅटरी २६५० मिलीअँपिअर क्षमतेची आहे. नोकिया ६ व नोकिया ५ हे मॉडेल अँड्रॉईडच्या ७.१ तर नोकिया ३ हे मॉडेल ७ नोगट आवृत्तीवर चालणारे आहे. या तिन्ही मॉडेल्समध्ये गुगलचा डिजीटल व्हर्च्युअल असिस्टंट प्रदान करण्यात आला आहे. आधी हे मॉडेल्स चीनसह काही राष्ट्रांमध्ये लाँच करण्यात आले होते. १३ जून रोजी यांना भारतीय बाजारपेठेत उतारण्याची घोषणा करण्यात आली आहे. नोकिया ३, ५ आणि ६ या मॉडेल्सचे मूल्य अनुक्रमे ९,४९९, १२,८९९ आणि १४,९९९ इतके रूपये असेल.

You might also like
Comments
Loading...