गूढ आवाजामुळे हादरले उस्मानाबादसह तीन तालुके

BREAKING NEWS

उस्मानाबाद : भूगर्भातून सोमवारी दुपारी चार वाजून चौतीस मिनिटांनी झालेल्या गूढ आवाजाने उस्मानाबाद, तुळजापूर, लोहारा तालुके हादरले. त्यामुळे ग्रामस्थांत काही काळ घबराट पसरली. अनेकजण घराबाहेर पडले. आवाजाचे गूढ उकलले नाही; पण तो आवाज कसला आहे , हे विचारण्यासाठी ग्रामस्थ एकमेकांशी संपर्क साधत होते.

लातूर-उस्मानाबाद जिल्ह्यांत ३० सप्टेंबर १९९३ ला झालेल्या प्रलयकारी भूकंपाच्या आठवणी ताज्या झाल्याचे अनेक ग्रामस्थांनी सांगितले. गूढ आवाजाबद्दल लातूर येथील भूकंपमापक केंद्रातील अधिकारी अभिजित बोरडेकर यांच्याशी संपर्क साधला असता, भूकंप झाल्याची नोंद झाली नसल्याचे ते म्हणाले.

जिल्ह्यात गेल्या काही वर्षांपासून अधूनमधून भूगर्भातून गूढ आवाज येत आहेत. ते नेमके कशाचे, याचा उलगडा झालेला नाही. या आवाजांमुळे घरांवरील पत्रे, दारे, खिड्क्यांचे तावदाने हादरतात, फडताळ्यावरील भांडी पडतात, पत्र्यांच्या घरांत अधिक तीव्रता जाणवते, असा अनुभव जिल्हावासीयांना अनेकदा आला आहे.

उस्मानाबाद तालुक्यातील येडशी, बेंबळी व परिसरातील बेंबळी, आंबेवाडी, विठ्ठलवाडी, महादेवावडी, शिवाजीनगर, रुईभर, केशेगाव, पंचमहाल, उमरेगव्हाण, केशेगाव, बामणी, वाडीबामणी, बरमगाव आदी गांवात तीन ते चार सेकंद हा आवाज जाणवला. बेंबळीत सोमवारी आठवडे बाजार असतो. तेथेही काही काळ घबराटीचे वातावरण होते. तुळजापूर तालुक्यातील अणदूर, सिंदफळसह अन्य काही गावांत जमिनीतून गूढ आवाज आल्यामुळे अनेक ग्रामस्थ घराबाहेर पडले. ग्रामस्थांनी एकमेकांशी संपर्क साधून माहिती व खुशालीबाबत विचारणा केली.

महत्वाच्या बातम्या :