आरक्षणावर कोणीही राजकारण करू नये,जयंत पाटीलांचा राजकीय पक्षांना सल्ला

टीम महाराष्ट्र देशा- मुस्लिम आरक्षण हा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मुस्लिम आरक्षणासाठी नेहमीच आग्रही राहिला आहे. मराठा आरक्षण हे मुस्लिम आरक्षणाच्या आड कधीच आलेले नाही. मराठा आरक्षण आणि मुस्लिम आरक्षण हे वेगळे विषय आहेत. पण जर यासंदर्भात एमआयएमच्या आमदारांनी याचिका दाखल केली असेल तर ते चुकीचं आहे, आरक्षणावर कोणीही राजकारण करू नये, असे मत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केले आहे.

दरम्यान,मुस्लीम आरक्षणाचा मुद्दा समोर करत एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील यांनी मराठा आरक्षणाविरोधात मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. ”राज्यातील मुस्लिम आरक्षणाच्या प्रलंबित मुद्यावर अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. मुस्लिम समाजाला जाणिवपूर्वक डावलले जात आहे”, आरोपही जलील यांनी केला आहे. शिवाय, ”मुस्लिम समाज आणि यातील काही ठराविक घटकांचे जातीनिहाय सर्वेक्षण करुन सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या मुस्लिम वर्गाला तात्काळ आरक्षण मंजूर करावे”, अशीही मागणी जलील यांनी केली आहे.