नोबल पुरस्कार विजेते कैलाश सत्यार्थींनी भाजपला करून दिली ‘राजधर्मा’ची आठवण

टीम महाराष्ट्र देशा : लोकसभा निवडणुकीचे शेवटचे दोन टप्पे खऱ्या अर्थाने गाजले असतील ते म्हणजे भाजपची भोपाळ लोकसभा मतदार संघातील उमेदवार आणि मालेगाव बॉम्ब स्फोटातील आरोपी प्रज्ञा सिंह ठाकूरच्या वाचाळ वक्त्यव्याने प्रज्ञा ठाकूरने राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची हत्या करणाऱ्या नथूराम गोडसेला देशभक्त म्हटले. यावर नोबल पुरस्कार विजेते कैलाश सत्यार्थी यांनी नाराजी व्यक्त केली. तसेच भाजपला चांगलेच खडे बोल सुनावले आहेत.

भारतीय जनता पक्षाने छोटासा राजकीय फायदा न पाहता राजधर्म पाळावा असं आवाहन सत्यार्थी यांनी केले आहे. त्यांनी ट्विट करून म्हटले की, नथुराम गोडसेने महात्मा गांधींच्या शरिराची हत्या केली होती. परंतु, प्रज्ञा ठाकूर यांच्यासारखे लोक गांधीजींच्या आत्म्यासह अहिंसा, शांती, सहिष्णुता आणि भारताच्या आत्म्याची हत्या करत आहेत. गांधीजी सत्ता आणि राजकारणाच्या पलिकडे आहेत. त्यामुळे भाजप नेतृत्वाने छोटासा फायदा सोडून प्रज्ञा ठाकूरची पक्षातून हकालपट्टी करत राजधर्माचे पालन करावे, असे सत्यार्थी यांनी म्हटले आहे.