‘आरे’तील वृक्षतोडी 30 सप्टेंबर पर्यंत होणार नाही, मुंबई उच्च न्यायालयाचा आदेश

टीम महाराष्ट्र देशा : आरेतील वृक्षतोड 30 सप्टेंबर पर्यंत होणार नसल्याची माहिती एमएमआरसीएलने उच्च न्यायालया दिली आहे. मेट्रोच्या कारशेड साठी आरेतील 2600 झाडे तोडण्यात येणार आहेत. या भीषण वृक्ष तोडीला महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण समितीने परवानगी दिली आहे. या परवानगी विरोधातच नागरिकांनी आणि पर्यावरण प्रेमींनी न्यायालयात धाव घेतली आहे.

याचिकांवरील सुनावणी मुख्य न्या. प्रदीप नंद्राजोग व न्या. भारती डांगरे यांच्या खंडपीठापुढे होती. उच्च न्यायालयाने त्यांच्या याचिकेवरील सुनावणी 30 सप्टेंबर रोजी घेऊ, असे सांगितले. तसेच वृक्ष प्राधिकरण समितीने एमएमआरसीएलला 2643 झाडे तोडण्याची अंतिम मंजुरी 13 सप्टेंबर रोजी दिल्याची माहिती दिली. तरीही एमएमआरसीएल पुढील 15 दिवस झाडे तोडू शकत नाही. महाराष्ट्र वृक्ष संवर्धन व जतन कायद्यांतर्गत प्राधिकरणाच्या निर्णयावर हरकती व सूचना देण्यासाठी 15 दिवसांचा कालावधी नागरिकांना द्यावा लागेल, असे द्वारकादास यांनी सांगितले.

नागरिकांना देण्यात आलेला 15 दिवसांचा कालावधी हा 28 सप्टेंबरला संपत आहे. त्यामुळे 30 सप्टेंबर पर्यंत आरेतील वृक्षतोड होणार नाही. तसेच एमएमआरसीएल 2185 झाडे तोडून 462 झाडे पुनर्रोपित करणार आहे. हा प्रकल्प जनहिताचा असल्याचे न्यायालयात एमएमआरसीएल व महापालिकेने सांगितले.

दरम्यान आरेतील वृक्षतोडीला नागरिकांनी प्रखर विरोध केला आहे. तसेच शिवसेनेने देखील आक्रमक भूमिका घेत आरेच्या वृक्षतोडीला विरोध केला आहे. वेळीच ऐका अन्यथा आरे चे नाणार होईल असा इशारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला आहे. त्यामुळे अरेच्या वृक्षतोडीवरून राजकीय खटके उडण्याचा संभव आहे.