मंत्री महादेव जानकरांना ‘झटका’

देसाईगंज नगरपालिका निवडणुकीत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यावर दबाव आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेले दुग्धविकासमंत्री महादेव जानकर यांच्या अडचणीत आणखी भर पडली आहे. या प्रकरणात दाखल झालेला गुन्हा रद्द करावा, या मागणीच्या याचिकेवर हस्तक्षेप करण्यास आज, शुक्रवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने नकार दिला आहे.

गडचिरोली जिल्ह्यातील देसाईगंज नगरपालिका निवडणुकीत दुग्धविकासमंत्री महादेव जानकर हे निवडणूक अधिका-यावर दबाव आणत होते. जानकर आणि निवडणूक अधिकाऱ्याचे मोबाईल संभाषण कॅमेऱ्यात कैद झाले होते. ‘नगराध्यक्षपदासाठी तुमच्याकडे दोन अर्ज येतील. त्यातील एक अर्ज काँग्रेसचा असेल. तर दुसरा अपक्ष म्हणून असेल. त्यातील काँग्रेसचा अर्ज बाद करा. ‘मोटवानी तुमच्याकडे अर्ज घेऊन येतील. त्यांना कपबशीचे चिन्ह द्या,’ अशा शब्दांमध्ये जानकर या व्हिडीओ क्लिपमध्ये बोलताना दिसत होते. याशिवाय ‘मी दुग्धविकास मंत्री महादेव जानकर बोलतो आहे’, असेदेखील जानकर या व्हिडीओमध्ये समोरच्याला सांगताना दिसत होते.

प्रसारमाध्यमांमधून हा व्हिडीओ समोर येताच जानकर यांच्यावर विरोधकांनी टीका सुरु केली होती. निवडणूक आयोगानेही या घटनेची गंभीर दखल घेत जानकर यांना नोटीस बजावली होती. तसेच त्यांच्यावर गुन्हादेखील दाखल झाला होता. निवडणूक आयोगाकडे महादेव जानकर यांनी खुलासादेखील केला होता. मात्र या खुलाशाने आयोगाचे समाधान झाले नव्हते. निवडणूक आयोगाकडून दिलासा मिळण्याची चिन्हे नसल्याने शेवटी जानकर यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाकडे याचिका दाखल केली होती. आज त्यावर सुनावणी झाली. या प्रकरणात हस्तक्षेप करण्यास खंडपीठाने नकार दिला आहे. या नकारामुळे जानकर यांनी याचिका मागे घेतल्याचे समजते.