विकास दुबेच्या एन्काऊंटरचे कोणी राजकारण करू नये : संजय राऊत

blank

मुंबई : कुख्यात गुंड विकास दुबेचा पोलिसांकडून खात्मा करण्यात आला आहे. विकास दुबेला काल (दि.9) उज्जैनमधून अटक करण्यात आली होती. उत्तरप्रदेश पोलीस दुबेला कानपूरला घेऊन जात असताना पोलिसांची गाडी पलटी झाली. यावेळी दुबेने पोलिसांची बंदूक घेऊन जाण्याचा प्रयत्न केला. यात पोलिसांकडून त्याचा खात्मा झालेला आहे.

पोलिसांची भीती ही राहिलीच पाहिजे. पोलिसांची भीती राहिली नाही तर गुंडाराज येईल. त्यामुळे विकास दुबे पोलीस एन्काऊंटर प्रकरणाचे कोणी राजकारण करु नये. तसेच गुन्हेगारीचेही राजकारण करु नये, अशी रोखठोक प्रतिक्रिया शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिली आहे. विकास दुबे हा गुन्हेगार होता. तो एका रात्रीत तयार झाला नाही. त्याचे अनेक पक्षांच्या राजकीय नेत्यांशी घनिष्ठ संबंध होते, त्यामुळे त्याला राजकीय वरदहस्त होता, असेही संजय राऊत यांनी म्हटले आहे.

संजय राऊत म्हणाले कि, हा उत्तर प्रदेश अथवा योगी आदित्यनाथ यांचा प्रश्न नाही. तर देशाच्या कोणत्याही राज्यात असे झाले असते तर पोलीस त्याला जिवंत सोडणार नाहीत. पोलीस आपल्या सहकाऱ्याच्या मृत्यूचा बदला नेहमी घेते. जे झाले त्याचे राजकारण होता कामा नये, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

अशा घटना याआधीही देशात झाल्या आहेत. मुंबईत तर आपल्याकडे अनेक एन्काऊंटर स्पेशलिस्ट आहेत. त्यांच्यावर चित्रपटही आले आहेत. दिल्ली, हैदराबादमध्येही अशा चकमकी झाल्या आहेत. मी खोट्या चकमकीचे कधी समर्थन केले नाही आणि करणारही नाही. पण जर पोलिसांची हत्या झाली असेल, पोलिसांची प्रतिष्ठा आणि भीती राहिली नसेल तर देशात कायदा-सुव्यवस्था राहणार नाही.

राऊत पुढे म्हणाले,विकास दुबेसारखी जी लोकं निर्माण केली जातात ती अनेक राजकारण्यांची गरज असते. निवडणुका जिंकण्यासाठी, खंडणी गोळा करण्यासाठी, दहशत निर्माण करण्यासाठी असे लोक काही राज्यात पोलीस, राजकारणी तयार करतात. विकास दुबेही अनेक पक्षांशी संबंधित होता. याला राजकारण जबाबदार आहे. आधी राजकारणी गुन्हेगारांचा वापर करुन घेत होते. आता गुन्हेगार राजकारणात येत आहेत. गुन्हेगारीचं राजकारण होणं धोकादायक आहे, असेही संजय राऊत यांनी सांगितले.

ओबीसींसाठी स्थापन झालेल्या महाज्योतीला 175 कोटी रुपये द्या- शेंडगे

‘शिवप्रेमींच्या भावना दुखावणाऱ्या कॉमेडीयन अग्रिमाने सर्वांची जाहीर माफी मागावी’

कोरोना चाचणीचा अहवाल खासगी प्रयोगशाळेने 24 तासाच्या आत करणे आता बंधनकारक