मोदी संविधान बदलणार आहेत असा खोडसाळ आरोप कोणी करू नये : आठवले

ramdas athawale

मुंबई  – पंतप्रधान नरेंद्र मोदी संविधान मानणारे,पूजणारे आहेत. त्यांनी 2019 च्या निवडणुकी नंतर संसदेत त्यांची नेता म्हणून निवड झाल्यानंतर त्यांनी प्रथम संविधानाला अभिवादन केले होते. त्यामुळे संविधान ते बदलणार असा खोडसाळ आरोप कोणी करू नये असा इशारा  केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री  रामदास आठवले यांनी विरोधकांना दिला.

काल  रामदास आठवले यांच्या बांद्रा येथील संविधान निवासस्थानी 71 संविधान ग्रंथाचे वाटप करण्यात आले.यावेळी संविधानाच्या प्रास्ताविकाचे सामूहिक वाचन करण्यात आले. यावेळी संविधानातील भारत साकार करण्याची प्रतिज्ञा घेण्यात आली.  यावेळी बोलताना संविधानकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानातुन वेळोवेळी कायदे निर्माण करण्याचा अधिकार संसदेला दिला आहे. त्यामुळे संविधान कोणी बदलण्याचा प्रश्नच उद्भवत नाही असे  देखील रामदास आठवले यांनी स्पष्ट केले.

रामदास आठवले यांनी कोरोनावार मात केल्याबद्दल आनंद व्यक्त करण्यासाठी आणि संविधान दिनाचे औचित्य साधत विजय वंजारी आणि विराज वंजारी यांनी संविधान बंगल्यावर 11 किलो पेढे वाटप केले.महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला दिलेले संविधान जगातील सर्वश्रेष्ठ संविधान आहे. समता,स्वातंत्र्य,न्याय,बंधुता,धर्मनिरपेक्षता या मूल्यांची पेरणी करणारे संविधान आहे. विविधतेने नटलेल्या भारताची राष्ट्रीय एकात्मता आणि अखंडता अबाधीत राखणारे,भारतीय लोकशाहीला मजबूत करणारे संविधान आहे.संविधान आपल्या देशाचा प्राण आहे. आपला श्वास आहे.संविधानाचा आम्हाला अभिमान आहे असे  रामदास आठवले म्हणाले.

महत्वाच्या बातम्या