राज्यातच नाही तर देशातही औरंगजेबाच्या नावाबाबत कुणी आग्रही असू नये; राऊतांचा काँग्रेसला टोला

raut

मुंबई:- मराठवाड्याची राजधानी अशी ओळख असलेल्या औरंगाबाद शहराचं नामांतर करुन या शहराला संभाजीनगर हे नाव देण्याची शिवसेनेची आग्रही मागणी आहे. मात्र, गेल्या 5 वर्षे शिवसेना सत्तेत असतानाही आणि विशेष म्हणजे गेल्या वर्षभरापासून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हेच राज्याचे मुख्यमंत्री असतानाही औरंगाबादचे संभाजीनगर झाले नाही.

महाविकास आघाडीतील मित्रपक्ष असलेल्या काँग्रेसने व राष्ट्रवादी काँग्रेसने नामांतराला विरोध असल्याचे जाहीरपणे सांगितले आहे. त्यामुळे शिवसेनेची कोंडी झाल्याचं दिसून आलं. नामांतराबाबत भाजपसह मनसेने देखील आक्रमक भूमिका घेतली आहे. शिवसेनेनं संभाजीनगर असं नामकरण करून हिंदुत्व सिद्ध करावं असं आव्हानच देण्यात आलं आहे.

काँग्रेसने किमान समान कार्यक्रमाची आठवण करून देत नामांतराला तीव्र विरोध केला आहे. तर, दुसरीकडं CMO अर्थात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कार्यालयाच्या ट्विटर अकाउंटद्वारे शासन निर्णय वा इतर माहिती देताना औरंगाबादचा संभाजीनगर असा उल्लेख केल्यानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष व मंत्री बाळासाहेब थोरात यांनी आगपाखड केली होती.

दरम्यान, औरंगाबादच्या नामांतराचा विषय हा व्होटबँकेचा मुद्दा नाही. हा लोकभावनेचा विषय आहे. त्यामुळे राज्यातच काय देशातही औरंगजेबाच्या नावाबाबत कुणीही आग्रही असू नये, असे वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केले आहे.

संजय राऊत रविवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी औरंगाबादच्या नामांतराला विरोध करणाऱ्या काँग्रेसला अप्रत्यक्षरित्या काही टोले लगावले आहेत. तसेच औरंगाबादचे नामांतर हा कॉमन मिनिमम प्रोग्रामचा भाग नाही. हा लोकभावनेचा विषय आहे. त्यामुळे या मुद्द्यावरुन शिवसेना आणि काँग्रेसला आमनेसामने आणू नये, असेही संजय राऊत यांनी स्पष्ट केले.

महत्वाच्या बातम्या