‘महाराष्ट्रात ऑक्सिजन अभावी एकाचाही मृत्यू नाही’, खा.संजय राऊत यांचा दावा

sanjay raut

अहमदनगर : देशातील कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये ऑक्सिजनच्या अभावी कोणाचाही मृत्यू झाला नाही असा अहवाल राज्यांनी आणि केंद्र शासित प्रदेशांनी दिल्याचे केंद्र सरकारने नुकसते संसदेच्या पावसाळी अधिवेशानत जाहीर केले होते. त्यामुळे केंद्र सरकारवर टीकेची झोड उठली होती. पण त्यानंतर राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनीही महाराष्ट्रात ऑक्सिजन अभावी मृत्यू झाला नसल्याचे सांगितले.

कोरोना काळात मृत्यू झाले असले तरी या काळात ऑक्सिजन मिळाला नाही म्हणून एकही मृत्यू झाला नसल्याची माहिती देत याबाबत सरकारने कोर्टात लेखी शपथपत्र दिल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी उस्मानाबादेत दिली होती. पण यानंतर आता शिवसेना नेते तथा खासदार संजय राऊत यांनीही ऑक्सिजन मृत्यू प्रकरणावर भाष्य केले आहे.

महाराष्ट्रात ऑक्सिजन अभावी एकाचाही मृत्यू झाला नाही असा दावा राऊत यांनी केला. अहमदनगर जिल्ह्यात ऑक्सिजन प्लान्टच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमासाठी संजय राऊत उपस्थित होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, ‘सुदैवाने महाराष्ट्रात ऑक्सिजन अभावी एकाचाही मृत्यू झाला नाही. पण अशी गंभीर परिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून शिवसैनिक तयारीला लागले आहेत. त्याकरिता अनेक ठिकाणी ऑक्सिजन प्लांटची उभारणी करण्यात येत आहे.’

दरम्यान, आरोग्यमंत्री टोपे यांनी काही दिवसांपूर्वी झालेल्या नाशिक दुर्घटना प्रकरणाची सविस्तर माहिती कोर्टात दिली होती. ‘नाशिक सारख्या घटनेत तर उलट ऑक्सिजन टॅंक भरलेला होता मात्र वेल्डिंग सारख्या काही तांत्रिक कारणाने गॅस लीक झाला त्यामुळे दुर्घटना घडली मात्र ऑक्सिजन कमी पडला नाही. ऑक्सिजन अभावी एकही मृत्यू न झाल्याचे शपथपत्र आम्ही कोर्टात दाखल केले आहे’ असे आरोग्यमंत्री टोपे म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या