२०१९ च्या निवडणुकीत माझ्यासमोरही कोणाचाही टिकाव लागणार नाही : नरेंद्र मोदी

टीम महाराष्ट्र देशा : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रिपबलिक भारत या वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. या मुलाखतीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या राजकारणाच्या सर्वांगावर भाष्य केले असून कॉंग्रेस घराण्यावर चांगलीच टोले बाजी केली आहे. २०१९ च्या निवडणुकीत माझ्यासमोरही कोणाचाही टिकाव लागणार नाही.असा विश्वास नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे. तर २०२४ चा विचार तेव्हा करू असे देखील मोदी म्हणाले आहेत.

यावेळी मोदी म्हणाले की, २०१९  मध्ये भाजपाच्या नेतृत्वातील एनडीए पुन्हा सत्तेत येणार आहे. या निवडणुकीत एनडीए ३०० हून जास्त जागा जिंकणार असून केंद्रात पुन्हा सत्ता स्थापन करणार आहे. विरोधकांनी आमच्याविरुद्ध आखलेली गणितं ही अपयशी ठरणार असल्याचा दावा नरेंद्र मोदी यांनी यावेळी केला आहे. पुढे नरेंद्र मोदी म्हणाले की, पहिल्या पासून कॉंग्रेसकडून देशातील तरुणांना फसवण्यात आले आहे. तसेच नेहरूसुद्धा गरिबांबद्दल बोलायचे, इंदिराही गरिबीचा मुद्दा उचलायच्या, राजीव हेसुद्धा गरिबीबद्दल बोलायचे, आता त्यांची पाचवी पिढीसुद्धा गरिबीचा मुद्दा उचलत आहे, असा टोला मोदी यांनी गांधी घराण्याला लगावला आहे.

या मुलाखतीत मोदींनी महागठबंधन कसे कोलमडणार आहे यावर देखील भाकीत केले. मोदी म्हणाले की, अर्ज भरल्यानंतर विरोधी पक्ष एकमेकांपासून आणखी विखुरले जाणार आहेत. तसेच २०१९ मध्ये जेव्हा आमचं सरकार सत्तेवर येईल तेव्हा आम्ही विरोधी पक्षांनाही सोबत घेऊन विकास करणार आहोत. अशी ग्वाही देखील त्यांनी दिली.

दरम्यान नरेंद्र मोदींनी पुलावामा हल्ल्याच्या वेळी विरोधकांनी एकजूट नराहता ज्या प्रकारची वक्तव्य आणि मागण्या केल्या याचा देखील समाचार घेतला. यावेळी मोदी म्हणाले की, जेव्हा अभिनंदन प्रकरण घडले तेव्हा देशातील सर्व राजकीय पक्षांनी पाकिस्तानचे एफ-16 विमान पाडणाऱ्या जवानाचा आम्हाला अभिमान आहे, असे एकजुटीने सांगण्याची गरज होती. मात्र ते सोडून या मंडळीने अभिनंदन परत कधी येईल, असा उलट प्रश्नांची विचारणा केली.

तसेच आम्ही विजय मल्ल्याच्या कर्जापेक्षा जास्त संपत्ती जप्त केली आहे. मल्ल्याने ९ हजार कोटींचे कर्ज घेतले होते, मात्र आमच्या सरकारनं त्याची जगभरातील १४ हजार कोटी रुपयांची संपत्ती जप्त केली आहे. आमच्या सरकारने कठोर पावलं उचलल्यामुळेच त्याला पळावं लागलं, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.