काहीही झालं तरी मी दिल्लीत आंदोलन करणारच; अण्णा हजारेंचा एल्गार!

anna hajare

अहमदनगर:- ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आंदोलन करण्याचा इशारा दिल्यानंतर केंद्रात सत्तेत असलेल्या भाजपचे नेते आणि माजी मंत्री गिरीश महाजन यांनी पुन्हा एकदा अण्णा हजारेंची राळेगणसिद्धीमध्ये भेट घेतली. यावेळी त्यांच्यासोबत खासदार डॉ.सुजय विखे पाटील उपस्थित होते. चर्चेनंतर जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात दिल्लीत आंदोलन करण्यावर आपण ठाम असल्याचे अण्णा हजारे यांनी स्पष्ट केले आहे.

भाजप नेते गिरीश महाजन यांनी हजारे यांच्या मनधरणीचा प्रयत्न केला. मात्र अण्णा हजारे यांनी आश्वासन नाही तर कृती करा, केंद्र सरकारने मान्य केले आहे, मात्र लागू केले तरच आंदोलन थांबवू अन्यथा जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यातील आंदोलनावर आपण ठाम असल्याचे सांगितले.

शेतकर्‍यांच्या मागण्यांसंदर्भात सन 2018 व सन 2019 मध्ये उपोषण केल्यानंतर पंतप्रधान कार्यालय व तत्कालिन केंद्रिय कृषी मंत्री राधामोहन सिंह यांनी लेखी आश्वासन दिले होते. त्याबाबत काहीही कार्यवाही केली नाही. त्यामुळे आपण उपोषण करणार असल्याचे अण्णा हजारे यांनी स्पष्ट केले आहे.

पंधरा दिवसांपूर्वी गिरीश महाजन यांनी राळेगणसिद्धी येथे अण्णा हजारे यांची भेट घेतली होती. त्यावेळी आपण या सर्व चर्चेचा तपशील माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामार्फत केंद्रीय मंत्र्यांपर्यंत पोहोचवू, असे सांगितले. मात्र महाजन यांनी पुन्हा अण्णा हजारे यांची भेट घेत मनधरणी करण्याचा प्रयत्न केला. मात्र हजारे हे आपल्या मागण्यांवर ठाम आहेत. त्यानंतर गिरीश महाजन यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी हजारे यांची फोनवरून चर्चा घडवून आणली. त्यातूनही काही निष्पन्न झाले नसल्याचे दिसून येते.

महत्वाच्या बातम्या