कोणी कितीही आपटली तरी मुंबईतील बॉलीवूडच्या केसाला धक्का लागणार नाही : शिवसेना

uddhav thakrey

मुंबई : बॉलिवूडला संपवण्याचा किंवा मुंबईतून बाहेर इतरत्र हलवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पण आम्ही हे कारस्थान सहन करणार नाही, असा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नाव न घेता योगी आदित्यनाथ आणि भाजप यांना दिला आहे. मुख्यमंत्री ठाकरे यांनी गुरुवारी (15 ऑक्टोबर) मल्टीप्लेक्स आणि सिनेमागृह मालकांशी व्हीडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधला. यानंतर मनसेने देखील बॉलिवूडच्या मागे खंबीरपणे उभे राहून समर्थन केलं आहे. बॉलिवूड स्थलांतराच्या याच चर्चांवर शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामना अग्रलेखातून भाष्य करण्यात आलं आहे.

सामना अग्रलेख :

बॉलीवूडला हादरे देऊन हा संपूर्ण उद्योग उद्ध्वस्त करण्याचा ‘डाव’ गंभीर आहे. मुळात कोणी कितीही आपटली तरी मुंबईतील बॉलीवूडच्या केसाला धक्का लागणार नाही. आंतरराष्ट्रीय वित्तीय केंद्र मुंबईतून हलवण्याइतके ते सोपे नाही. मुख्यमंत्र्यांनी या क्षेत्रातील प्रमुख लोकांशी चर्चा केली व त्यांना दिलासा दिला हे योग्यच झाले. दादासाहेब फाळके या मराठी माणसाने हिंदुस्थानी सिनेसृष्टीचा पाया मुंबई-महाराष्ट्रात घातला. हा पाया कच्च्या पायावर उभा नाही. लवकरच ‘पडदे’ जिवंत होतील, बॉलीवूडला जाग येईल. मुख्यमंत्र्यांवर विश्वास ठेवायला हवा.

बॉलीवूडला संपविण्याचा डाव खपवून घेणार नाही, असा दम मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भरला आहे. त्यामुळे ज्यांच्यापर्यंत हा संदेश पोहोचायला हवा तेथे तो नक्कीच पोहोचला आहे. हिंदी सिनेसृष्टी म्हणजे बॉलीवूडची पाळेमुळे मुंबईत पसरलेली आहेत. गेल्या शंभर वर्षांपासून ही पाळेमुळे मजबुतीने टिकून आहेत. अनेकांचे कष्ट आणि घाम त्या कारणी लागले आहेत; पण सुशांत मृत्यू प्रकरणानंतर काही पोटदुख्यांनी बॉलीवूडविरोधात जी मोहीम सुरू केली आहे ती धक्कादायक आहे.

मुख्यमंत्र्यांनी काल सांगितले की, बॉलीवूडला गेल्या काही दिवसांपासून ठराविक वर्गाकडून बदनाम करण्यात येत आहे. ही बाब अत्यंत वेदनादायक आहे. बॉलीवूडला संपवण्याचे किंवा हे क्षेत्र अन्यत्र हलवण्याचे कटकारस्थान कोणी रचत असेल तर ते उधळून लावू. मुख्यमंत्र्यांनी अत्यंत परखडपणे यावर भाष्य केले हे बरे झाले. लॉकडाऊन काळात बॉलीवूडचे काम थंडावले. चित्रीकरणावर बंधने आली.

टीव्हीवरील मालिकांचे चित्रीकरण सुरू झाले आहे; पण सिने जगतावर आजही मंदीच्या सावल्या आहेत. या क्षेत्रात गुंतवणूक मोठी आहे; पण कोरोना संसर्गामुळे सात महिन्यांपासून सिनेमागृहे बंद आहेत. सिनेमागृहांचे स्वतःचे एक अर्थकारण आहे. फक्त सिनेमागृहांच्या उद्योगावरच अनेकांचे घरसंसार सुरू असतात. तिकीट विकणारे, खानपान सेवा, इतर तांत्रिक कर्मचारी, साफसफाई करणारे अशा लाखो लोकांचा रोजगार सिनेमागृहांच्या पडद्यामुळे टिकतो. हा पडदाच गेल्या सात महिन्यांपासून काळोखात हरवला आहे. ‘बॉलीवूड’ म्हणजे फक्त नट-नटय़ांची चमकधमक नाही, तर हे असे जोड उद्योगदेखील आहेत.

कपडेपट सांभाळणारे, मेकअपमन, लाईटमन, स्पॉटबॉय, साऊंड आर्टिस्ट, डबिंगवाले, वादक, संगीतकार, डमी, एक्स्ट्रामधले कलाकार असे मिळून पाचेक लाख लोकांना थेट रोजगार देणारा हा उद्योग आहे. हिंदी सिनेसृष्टी तर आहेच; पण मराठी, गुजराती, भोजपुरी, दाक्षिणात्य, बंगाली, ओरिसा  असे त्या त्या भाषेतले मनोरंजन क्षेत्रदेखील आहे. पूर्ण लॉक डाऊन झाल्याने अनेकांची अवस्था बिकट झाली आहे. गेल्या काही महिन्यांत मनोरंजन क्षेत्रातील अनेक कलावंतांवर रस्त्यावर भाजी, फळे वगैरे विकण्याची वेळ आली. तशा बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत. काही लहान-मोठे कलाकार, तंत्रज्ञ वगैरेंनी जिवाचे बरेवाईट करून घेतले. हे चित्र काही चांगले नाही. मनोरंजन उद्योगाला आधार देण्याची ही वेळ आहे. त्याऐवजी महाराष्ट्राशी बेइमानी करणारे काही आपमतलबी मनोरंजन उद्योगावर घाव घालीत आहेत.

महत्वाच्या बातम्या-