मुंबई : एसटीचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण या प्रमुख मागण्यांसाठी एसटी कर्मचारी आक्रमक झाले आहेत. (MSRTC Strike) गत चार दिवसांपूर्वी परिवहन मंत्री अनिल परब(Anil Parab) यांनी पगार वाढीचा निर्णय जाहीर केल्यानंतर एसटी कर्मचाऱ्यांनी कामावर हजर रहाण्याचे आवाहन केले. त्यानंतरही अनेक कर्मचारी विलीनीकरणाच्या मागणीसाठी अडून बसले असून कामावर येण्यास तयार नाहीत. त्यामुळे अनेकांवर निलंबनाची कारवाई सुरु करण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर सोमवारी एक हजार ८८ कर्मचाऱ्यांचे निलंबन तर २५४ रोजंदारी कर्मचाऱ्यांची सेवा समाप्ती करण्यात आली आहे. दरम्यान, कितीही कारवाई केली तरी विलीनीकरण होईपर्यंत आंदोलन कायम राहणार, असा निर्धार एसटी कर्मचाऱ्यांनी केला आहे.
एसटी महामंडळाचे शासनात विलीनीकरण या प्रमुख मागणीसाठी आझाद मैदानावर एसटी कर्मचाऱ्यांकडून आंदोलन सुरू आहे. या आंदोलनात एसटीचे दोनशे कर्मचारी अद्यापही आझाद मैदानात ठाण मांडून बसले आहेत. अक्कलकोट येथील एका कर्मचाऱ्याने सांगितले की, आम्हाला राज्य सरकारकडून कारवाईची भीती दाखवली जात आहे. पण कारवाई आमच्यासाठी नवीन नाही. आम्ही आतापर्यंत कारवाईतच जगत आलो आहोत. त्यामुळे कितीही कारवाई झाली तरी आमची मागणी मान्य झाल्याशिवाय आम्ही माघार घेणार नाही. तर राजगुरू नगर आगारातील एका एसटी कर्मचाऱ्याने सांगितले की, विलीनीकरणाच्या मागणीवर सरकारकडून कोणताही निर्णय घेतला जात नाही. उलट आंदोलन करणाऱ्या कर्मचाऱ्यांना नोटीस बजावण्यात येत आहे. कामात हलगर्जीपणा, एसटी विरोधात आंदोलन, जनतेला वेठीस धरल्याबद्दल निलंबित केल्याचे सांगितले आहे.
दरम्यान, कल्याण येथील एका कर्मचाऱ्याने सांगितले की, आम्ही राज्यभरातील कर्मचाऱ्यांना मुंबईत येण्याचे आवाहन केले आहे. खाण्यापिण्याचा खर्च परवडत नसल्याने कर्मचाऱ्यांनी परतीची वाट धरली आहे. पण ते घरी परत गेले तरी काम बंदच ठेवणार आहेत. त्यामुळे आझाद मैदानातील गर्दी कमी झाली तरी आंदोलन सुरूच असणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या:
- महापौर किशोरी पेडणेकरांनी मध्यरात्री अचानक मुंबई विमानतळाला भेट देत केली पाहणी
- १५ दिवसांमध्ये आफ्रिकेतून ४६६ प्रवासी मुंबईत दाखल; १०० प्रवाशांच्या होणार पुन्हा चाचण्या
- ‘…याचा मला पश्चात्ताप आहे’, अजित पवारांसोबतच्या ‘त्या’ शपथविधीविषयी फडणवीसांचे वक्तव्य
- ग्रामपंचायत, पंचायत समिती निवडणुकांसदर्भात मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय
- पालकमंत्री सुभाष देसाईंचा निधी वाटपात अन्याय; काँग्रेस पदाधिकाऱ्यांची बाळासाहेब थोरातांकडे तक्रार!