मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी आता यापुढे निवडणूक नाही

नागपूर : अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी यापुढे निवडणूक घेतली जाणार नसल्याचा निर्णय अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाने घेतला आहे. महामंडळाचे अध्यक्ष श्रीपाद भालचंद्र जोशी यांच्या अध्यक्षतेखाली नागपूर येथे झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.

दरम्यान यासाठी महामंडळाच्या घटनेत दुरूस्ती करण्यात येणार असून, त्याला सर्व घटक संस्थांची मान्यता महामंडळाला घ्यावी लागणार आहे. त्यानंतर हा निर्णय अंमलात येईल.साहित्य संमेलनाच्या निवडणूकीमुळं अनेक ज्येष्ठ साहित्यिक अध्यक्षपदापासून दूर राहिले. साहित्याशी संबंध नसलेले मतदार,व अनेक प्रकारचे दबाव गट यामुळे अनेक सुमार साहित्यिक अध्यक्षपदावर आले असा आरोप होत होता.

साहित्या सारख्या क्षेत्रात निवडणूक नकोच अशी देखील मागणी गेल्या अनेक दिवसांपासून होती. ही मागणी लक्षात घेऊन, मराठी साहित्य महामंडळाकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. आता यापुढे महामंडळ साहित्य क्षेत्रातल्या मान्यवरांशी आणि साहित्य संस्थांशी चर्चा करून साहित्य संमेलनाच्या अध्यक्षांचं नाव ठरवणार आहे.