अविश्वास प्रस्ताव : सेना-भाजपचे ‘हम साथ साथ है’!

uddhav &; modi

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल करण्यात आल्यानंतर शिवसेनेच्या भूमिकेबाबत उलटसुलट चर्चांना उत आला होता. मात्र अविश्वास प्रस्तावादरम्यान मोदी सरकारच्या बाजूने मतदान करण्याचा निर्णय शिवसेनेने घेतला असून, सरकारच्या बाजूने मतदान करण्यासाठी उपस्थित राहण्याचा व्हीप आपल्या खासदारांना बजावला आहे. त्यामुळे अविश्वास प्रस्तावापूर्वीच मोदी सरकारचे पारडे जड झाले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारविरोधात वेळोवेळी नाराजी व्यक्त करणारी शिवसेना विरोधकांनी दाखल केलेल्या अविश्वास ठरावाच्या मतदानाच्या वेळी मोदी सरकारच्या बाजूने उभी राहणार का, याची उत्सुकता निर्माण झाली होती. तेलगू देसम पक्षाने अविश्वास प्रस्तावासाठी पुढाकार घेतला आहे. शिवसेना खासदाराला विमान कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी अपमानास्पद वागणूक दिली होती. त्यावेळी तेलगू देसम पक्षाचे खासदार केंद्रीय हवाई नागरी मंत्रीपदी होते. या प्रकरणात तेलगू देसमने शिवसेनेला अपेक्षित साथ दिली नव्हती. यामुळे शिवसेना तेलगू देसमवर नाराज आहे. तसेच भाजपाकडे २७३ चा बहुमताचा आकडा असल्याने शिवसेनेने अविश्वास दर्शक प्रस्तावाविरोधात भाजपाला साथ देण्याचा निर्णय घेतला आहे.

मोदी सरकारच्या विरोधातील पहिला अविश्वास प्रस्ताव लोकसभाध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी दाखल करून घेतला असून, त्यावर शुक्रवारी चर्चा होणार असून, त्यानंतर मतदान घेतले जाईल. आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा देण्याच्या मागणीसाठी तेलुगू देसम, तर शेतकऱ्यांच्या आत्महत्या व महिलांवरील बलात्कार रोखण्यात सरकार अपयशी ठरल्याबद्दल काँग्रेसतर्फे अविश्वास ठराव देण्यात आला होता. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षानेही जमावाचा हिंसाचार या विषयावर अविश्वास ठरावाची नोटीस दिली होती.

लोकसभेत मोदी सरकारची परीक्षा, अविश्वास प्रस्ताव मांडण्यास अध्यक्षांची मंजुरी