सरकारचे दूत गिरीश महाजन अण्णांची मनधरणी करण्यात असफल

टीम महाराष्ट्र देशा : जनलोकपाल आंदोलनावर जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची शिष्टाई अखेर निष्फळ ठरली. २३ मार्चच्या आंदोलनावर ठाम असल्याचं ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी सांगितलं. महाजन केवळ मंत्री आहेत. दिल्लीतल्या बॉसच्या हातात सूत्र आहेत. त्यामुळे चर्चा नव्हे, तर ठोस निर्णय घ्या, असं अण्णा म्हणाले.

अधिवेशनात कोणतं विधेयक मांडणार ते अगोदर सांगा, असंही अण्णांनी बजावलं. वेळ कमी पडत असल्यास अधिवेशनाचा कालावधी वाढवा, असंही अण्णांनी सुचवलं. आता केवळ चर्चा नव्हे, तर ठोस निर्णय घेण्याची मागणी त्यांनी केली. पत्रांना उत्तर देण्यासाठी परदेशी दौऱ्यातून पंतप्रधानांना सवड नसेल किंवा ईगो असेल, असा टोलाही अण्णांनी लगावला.

दरम्यान, या प्रकरणी महाजन यांनी मुख्यमंत्री अण्णांच्या आंदोलन आणि मागण्यांवर गंभीर असल्याचं सांगितलं. मुख्यमंत्री पंतप्रधान कार्यालयाशी संपर्क साधून आहेत. चर्चेला वेळ मिळाल्यास मार्ग निघेल, असं महाजन यांनी सांगितलं. अण्णांच्या मागण्यांची व्याप्ती मोठी असल्याने त्वरित निर्णय घेता येणार नाही. यासाठी अधिवेशनात काही विधेयकं मंजूर करावी लागतील, असंही महाजन यांनी म्हटलंय.