‘ते’ वादग्रस्त वक्तव्य भोवलं : इंदुरीकर महाराजांना अखेर नोटीस रवाना

नगर : स्त्री संग सम तिथीला झाला तर मुलगा होतो, विषम तिथीला झाला तर मुलगी होते’ स्त्री संग जर अशीव वेळेला झाला तर ती रांगडी, बेवडी व खानदान मातीत मिळवणारी होतात. असे विधान कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर यांनी एका कीर्तनादरम्यान केले होते.

मात्र त्यांच्या या विधानाने इंदुरीकर यांच्यावर गर्भलिंग निदान निवडीची जाहिरात करून पीसीपीएनडीटी कायद्याच्या कलम 22चे उल्लंघन केल्याप्रकरणी इंदुरीकरांवर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. अहमदनगरच्या पीसीपीएनडीटी सल्लागार समितीकडून इंदुरीकर यांच्याविरोधात कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

दरम्यान, गर्भलिंग निदानाबाबत कीर्तनात केलेल्या वक्तव्यासंबंधी निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर यांना आरोग्य विभागाकडून अखेर कायदेशीर नोटीस पाठविण्यात आली आहे. त्यांच्या कथित वक्तव्याबद्दल खुलासा मागविण्यात आला असून, त्यानंतर पुढील कारवाईचा निर्णय होणार असल्याचे जिल्हा शल्यकित्सक डॉ. प्रदीप मुरंबीकर यांनी सांगितले.

जिल्हा रुग्णालयात नुकत्याच झालेल्या पीसीपीएनडीटी सल्लागार समितीच्या बैठकीत हा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता. सदस्यांनी हा मुद्दा उपस्थित केल्याने त्याची रितसर नोंद घेण्यात आली. नियमानुसार यासंबंधी पुढील कारवाई करणे आरोग्य विभागास भाग पडते. त्यामुळे या कायद्यातील तरतुदींनुसारच इंदुरीकर यांना नोटीस पाठवून खुलासा मागविण्याचा निर्णय घेण्यात आला. बुधवारी ही नोटीस पाठविण्यात आली. त्यावर येणारा खुलासा वरिष्ठांकडे पाठवून पुढील निर्णय घेण्यात येणार असल्याचे डॉ. मुरंबीकर यांनी सांगितले.