नितीश कुमार आज सहाव्यांदा मुख्यमंत्री पदावर विराजमान

nitishkumar , narendra modi

वेब टीम:- काल बिहारच्या राजकीय वर्तुळात धक्का देणारे नितीश कुमार यांनी बिहारच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर लगेच आज ते पुन्‍हा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. आज सकाळी १० वाजता शपथविधी सोहळा राजभवन येथे होणार आहे. मात्र, यावेळी ते आपला जुना सहकारी भाजपच्या साथीने सरकार बनवणार आहेत. यावेळी भाजपनेते सुशिल कुमार मोदी हे उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील.

नितीश कुमार यांनी याबाबत राज्यपाल केसरीनाथ त्रिपाठी यांची रात्री उशीरा भेट घेतली. नितीश कुमार हे सहाव्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील. सुशिल कुमार मोदी यांनी नव्याने स्‍थापन होणार्‍या सरकारला १३२ आमदारांचा पोठिंबा असल्याचे सांगिते. यामध्ये ७१ आमदार जेडीयू, भाजपचे ५३, आरएसएलपीचे २, लोजपचे २, एचएएम १ तसेच अपक्ष ३ आमदार यांचा समावेश असणार आहे.

चार वर्षांनंतर पुन्‍हा संयुक्‍त जनता दल व भारतीय जनता पक्ष पुन्‍हा एकत्र येत आहेत. नितीश कुमार यांनी जुलै २०१३ मध्ये राष्‍ट्रीय लोकशाही आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. भाजपने २०१४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी नरेंद्र मोदी यांना पंतप्रधानपदाचा चेहरा म्‍हणून पुढे केल्यानंतर कुमार यांनी हा निर्णय घेतला होता.

लालू प्रसाद यांचे चिरंजीव आणि उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांच्यावर झालेल्या भ्रष्टाचारांच्या आरोपांच्या मुद्यावरुन नितीश कुमार यांनी राजीनामा दिला. यानंतर लालू प्रसाद यादव यांनी त्यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले. भाजपने नितीश कुमार यांना पाठिंब्याची ऑफर दिली आहे. त्यामुळे पुन्‍हा एकदा नितीश कुमार यांच्या नेतृत्‍वाखाली राष्‍ट्रीय लोकशाही आघाडीचे सरकार बिहारमध्ये सत्तेवर येणार आहे.