नितीश कुमार यांनी बिहारच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला

वेब टीम:- बिहारच्या राजकारणात मोठा भूकंप झाला आहे. नितीश कुमार यांनी बिहारच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. राज्यपालांची भेट घेऊन नितीश कुमार यांनी राजीनामा सुपूर्द केला. बिहार सरकारच्या सत्ताधारी आघाडीतील संघर्ष आता शिगेला पोहोचला आहे. भ्रष्टाचाराच्या आरोपानंतर उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी राजीनामा द्यावा आणि स्पष्टीकरण द्यावं अशी नितीश कुमारांची इच्छा होती. मात्र, तेजस्वीचा राजीनामा घेण्यास राजद अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांनी आडकाठी केल्यानंतर नितीश नाराज झाले होते. तेजस्वी यादव यांचा राजीनामा घेण्यात ते अपयशी ठरत असल्याचं लक्षात आल्यानंतर त्यांनी राजीनामा दिल्याचं बोललं जात आहे.
बुधवारी संध्याकाळी पाटणामध्ये नितीश कुमारांनी जदयूच्या आमदारांची , खासदारांची आणि इतर नेत्यांची बैठक बोलावली होती. बैठकीनंतर नितीश राज्यपालांना भेटायला गेले. राज्यपालांना भेटून त्यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला.
सीबीआयने भ्रष्टाचाराच्या आरोपावरून तीन आठवड्यांपूर्वी पाटण्यात राजदचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव व त्यांचे पुत्र तेजस्वी यादव यांच्या निवासस्थानांवर छापे मारले होते. नितीश कुमार हे कोणत्याही स्थितीत आपली व आपल्या सरकारची प्रतिमा मलिन होऊ देण्यास तयार नव्हते. त्यामुळे अखेर नितीश कुमार यांनी राजीनामा दिला.
काय आहे प्रकरण..?
बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांच्यासह आरजेडी प्रमुख लालूप्रसाद यादव यांच्या मालमत्तांवर सीबीआयने छापेमारी केली होती.
या छापेमारीत तेजस्वी यादव यांच्याकडे बेहिशेबी मालमत्ता असल्याचं आढळून आलं होतं. त्यामुळे तेजस्वी यादव यांनी राजीनामा देण्याची मागणी जोर धरत होती.
दुसरीकडे  लालू प्रसाद यादव यांनी राजदच्या आमदारांची बैठक घेऊन, तेजस्वी यादव पदाचा राजीनामा देणार नाहीत, असं जाहीर केलं. तर तेजस्वी यादव यांनी राजीनामा दिला नाही तर त्यांना बडतर्फ करण्याचा इशारा मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी दिला होता.
बिहारमध्ये जेडीयू, आरजेडी आणि काँग्रेसची युती आहे. या छापेमारीनंतर  गेल्या काही दिवसांपासून नितीश कुमार आणि लालूप्रसाद यादव यांचं बोलणंही बंद झालं आहे. त्याचा भाग म्हणून बिहारमध्ये झालेल्या एका सरकारी कार्यक्रमाला नितीश कुमारांची हजेरी होती, पण उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी दांडी मारली होती.
नितीश कुमार म्हणाले, “मागील काही महिन्यात बिहारमध्ये महायुती सरकारने अनेक कल्याणकारी योजना आणल्या. लालू यादव आणि काँग्रेसशी परिस्थितीवर तोडगा काढण्यासाठी चर्चा केली, मात्र काहीही तोडगा निघाला नाही.  गेल्या काही दिवसांपासूनची जी परिस्थिती आहे, त्यामध्ये काम करणं अशक्य झालंय. नोटाबंदीचं समर्थन केलं तरीही माझ्यावर आरोप करण्यात आले. आम्ही राजकारण करतच नाही, काहीही मार्ग नाही पाहून स्वतःच राजीनामा दिला”.