नितीशकुमारांनी बंगल्यात भूत सोडलं; लालू पुत्राची भागम भाग

lalu prasad son and nitesh kumar and ghost in house

टीम महाराष्ट्र देशा- राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख (आरजेडी) लालूप्रसाद यादव यांचे मोठे पुत्र तेजप्रताप यादव यांनी केलेल्या हास्यास्पद आरोपांमुळे पुन्हा एकदा ते चर्चेत आले आहेत. मला या निवासस्थानातून बाहेर काढण्यासाठी मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी इथे भूत सोडले होते, असा आरोप त्यांनी केला आहे. नितीश आणि उपमुख्यमंत्री सुशीलकुमार मोदी यांनी येथे भूत सोडल्यामुळेच मी ते निवासस्थान सोडण्याचा निर्णय घेतला. ते भूत मला त्रास देत होतं असा हास्यास्पद आरोप तेजप्रताप यादव यांनी केला आहे.

सुमारे २० महिने आरजेडी-जेडीयू आणि काँग्रेसची युती टिकल्यानंतर नितीश कुमार यांनी महाआघाडीशी आपले नाते तोडले आणि २७ जुलै २०१७ ला पुन्हा एकदा भाजपाबरोबर सरकार स्थापन केले. त्यानंतर ऑगस्ट महिन्यात राज्य भवन निर्माण विभागाने आरजेडी आणि काँग्रेसच्या माजी मंत्र्यांना अधिकृत निवासस्थान रिकामे करण्याची नोटीस पाठवली होती तसेच ऑक्टोबरमध्ये आलेल्या नोटिशीत १५ टक्के भाडे वाढ करण्याचा इशारा दिला होता.

हे सगळे घडत असून देखील तेजप्रताप यादव सरकारी निवासस्थान सोडण्याच्या मनस्थितीत नव्हते . अखेर त्यांनी मागील आठवड्यात आपले अधिकृत सरकारी निवासस्थान सोडले आहे. परंतु, हे सोडताना त्यांनी विचित्र कारण दिल्यामुळे अनेकांच्या भुवया आश्चर्याने उंचावल्या आहेत. नितीश आणि उपमुख्यमंत्री सुशीलकुमार मोदी यांनी येथे भूत सोडल्यामुळेच मी ते निवासस्थान सोडण्याचा निर्णय घेतला. ते भूत मला त्रास देत होतं असा हास्यास्पद आरोप तेजप्रताप यादव यांनी केला आहे.

तेजप्रताप यादव यांनी गेल्यावर्षी जून महिन्यात आपल्या निवासस्थानी ‘दुश्मन मारन जप’ केल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले. कारण त्याचवेळी केंद्रीय तपास यंत्रणा त्यांच्या कुटुंबीयांविरोधात भ्रष्टाचाराच्या आरोपांचा तपास करत होते. त्यांनी ज्योतिषांच्या सल्ल्याने निवासस्थानाच्या दक्षिण दिशेचा दरवाजाही बंद केला होता.