यापुढे वीजपुरवठा सतत खंडित होणं अधिकाऱ्यांना पडणार महागात

Nitin Raut

पुणे : सर्व वर्गवारीतील वीजग्राहकांच्या अखंडित वीजपुरवठ्यासाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात. त्यात कोणत्याही प्रकारची हयगय करू नये. सातत्याने वीजपुरवठा खंडित होत असल्यास संबंधीत जबाबदार अधिकारी, कर्मचाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात यावी असे आदेश राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दिले.

पुणे, कोल्हापूर, सांगली, सोलापूर व सातारा जिल्ह्यातील विविध कामांचा ऊर्जामंत्री ना. डॉ. नितीन राऊत यांनी शुक्रवारी (दि. 29) व्हीडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे आढावा घेतला. यावेळी ते बोलत होते. ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव आणि महावितरण कंपनीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक दिनेश वाघमारे यावेळी उपस्थित होते. ऊर्जामंत्री डॉ. राऊत म्हणाले, कोरोना विषाणूच्या सावटामुळे बंद असलेले व्यवसाय, उद्योग हळूहळू सुरु होत आहेत. यासोबतच शासकीय व खासगी संस्थांच्या कर्मचाऱ्यांचे वर्क फ्रॉम होम देखील सुरु आहे. सध्या उन्हाळा असल्याने अखंडित व सुरळीत वीजपुरवठ्याची अत्यंत गरज आहे. ज्या भागात सातत्याने वीजपुरवठा खंडित होत आहे त्याची गंभीर दखल घेऊन संबंधीत जबाबदार व अकार्यक्षम कर्मचारी, कर्मचाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करावी. प्रसंगी वरिष्ठ अधिकाऱ्यांना सुद्धा अशा कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशारा यावेळी त्यांनी दिला

धक्कदायक : कोरोना टेस्टचे सॅम्पल माकडांनी पळवले

बारामती परिमंडलामध्ये ‘एक गाव- एक दिवस’ हा वीजयंत्रणेच्या देखभाल व दुरुस्तीचा, नवीन वीजजोडणी व वीजबिल दुरूस्ती मोहिमेचा उपक्रम सुरु आहे. या उपक्रमाचे डॉ. राऊत यांनी कौतुक केले. हा उपक्रम राज्यभरात राबविण्याचे त्यांनी निर्देश दिले. वीजग्राहकांना प्रामुख्याने वीजपुरवठ्याबाबतची माहिती ‘एसएमएस’द्वारे मिळालीच पाहिजे. देखभाल व दुरुस्तीसाठी वीज बंद ठेवण्याची पूर्वसूचना असेल किंवा इतर कारणामुळे वीजपुरवठा खंडित झाल्यास त्याची ग्राहकांना पूर्वसूचना न मिळाल्यास गंभीर दखल घेतली जाईल असे त्यांनी स्पष्ट केले. प्रत्येक जिल्हा व तालुक्यासाठी असलेली विद्युत वितरण सनियंत्रण समितीच्या सदस्यांनी निवडप्रक्रिया सुरु होत आहे. या समितीच्या नियमित बैठकी घेण्यासोबतच स्थानिक लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन वीजविषयक स्थानिक प्रश्न सोडविण्यात यावे तसेच थकबाकी वसुलीसाठी प्रयत्न करावेत असे ऊर्जामंत्री राऊत यांनी सांगितले.

सुरळीत वीजपुरवठ्याला सर्वोच्च प्राधान्य देत वीजयंत्रणेच्या देखभाल व दुरुस्तीसाठी राज्यभरात कंत्राटदार नेमण्यात आले आहे. या कंत्राटदारांकडून तत्परतेने किंवा आवश्यकतेनुसार समाधानकारक कामे होत नसल्यास किंवा त्यांच्या अकार्यक्षमतेमुळे खंडित वीजपुरवठ्याचा कालावधी वाढत असल्यास अशा कंत्राटदारांविरुद्ध ताबडतोब कारवाई करण्यात यावी आणि त्यांचा काळ्या यादीत समावेश करावा, अशी सूचना यावेळी ऊर्जामंत्री डॉ. राऊत यांनी दिली.

या आढावा बैठकीत महावितरणचे कोकण विभागाचे सहव्यवस्थापकीय संचालक गोविंद बोडके, संचालक (संचालन) दिनेशचंद्र साबू, संचालक (प्रकल्प) भालचंद्र खंडाईत, संचालक (मानव संसाधन) ब्रिगेडियर (सेवानिवृत्त) पी. के. गंजू, प्रभारी संचालक (वित्त) स्वाती व्यवहारे, पुणे प्रभारी प्रादेशिक संचालक अंकुश नाळे, मुख्य अभियंता सुनील पावडे (बारामती), सचिन तालेवार (पुणे), अंकुर कावळे (प्रभारी, कोल्हापूर) आदींसह पश्चिम महाराष्ट्रातील वरिष्ठ अभियंते, अधिकारी यांची उपस्थिती होती.

उद्या ‘मन की बात’ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी कोणत्या घोषणा करणार ? देशवसियाचं लक्ष