कॉंग्रेसच्या ‘त्या’ ४८ वर्षांपेक्षा भाजपची ४८ महिन्यातली कामगिरी उत्तम – गडकरी

nitin-gadkari

मुंबई – मोदी सरकारच्या ४८ महिन्यांच्या कालावधीत फार मोठे सामाजिक व आर्थिक परिवर्तन आपल्या देशात झाले असल्याचे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केले. ते केंद्रातील मोदी सरकारला चार वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत बोलतं होते. यावेळी त्यांनी सरकारने केलेल्या कामगिरीचा लेखाजोखा सादर केला.

ते यावेळी बोलताना म्हणाले की, लोकांच्या सर्व अपेक्षा अद्याप पूर्ण झालेल्या नाहीत हे जरी खरे असले, तरी आठ कोटी कुटुंबांना घरगुती गॅस, बँकिंग व्यवस्थेच्या बाहेर असलेल्या कोटय़वधी गरिबांना बँकेशी जोडणारी जन-धन योजना, दहा कोटी कुटुंबांना पाच लाखांचा आरोग्यविमा देणारी आयुष्मान योजना, ग्रामीण भागात वीजजोडणी अशी लोकांच्या जीवनात अच्छे दिन आणणारी अनेक कामे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने केली आहेत.

नेहरू-गांधी घराण्याच्या ४८ वर्षांच्या राजवटीत झाली नाहीत इतकी कामे मोदी सरकारच्या ४८ महिन्यांत सुरू झाल्याचं देखील त्यांनी म्हंटलं आहे. तसेच यापुढेही केंद्रसरकार कायमच देश हिताच्या, आणि विकासाच्या दृष्टीने निर्णय घेणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.