गडकरी झाले मुख्यमंत्र्यांचे शेजारी; रामनगरात गेले वास्तव्याला

नितीन गडकरी

नागपूर: प्रत्येक शहरात अशी एक वास् जी, त्या शहराची ओळख बनून जाते. सुमारे 300 वर्षांचा इतिहास असलेल्या नागपुरात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या महाल परिसरातील “वाडा” नावाने प्रसिद्ध असलेल्या निवसस्थानाचे देखील असेच होते. परंतु, गडकरी कुटुंबीय आता हा वाडा सोडून रामनगरात भक्ती बंगल्यात वास्तव्याला गेले आहे. विशेष म्हणजे त्यांचे हे नवीन निवासस्थान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घराजवळ आहे. त्यामुळे शहरातील सत्ताकेंद्र नवीन नागपुरात स्थलांतरित झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

केंद्रीयमंत्री नितीन गडकरी हे विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते असल्यापासून त्यांचे महाल परिसरातील निवासस्थान नावारूपाला आले. पुण्याप्रमाणे नागपुरातही जुन्याकाळी वाडे संस्कृती होती. सीताबर्डी परिसरातील बुटी वाडा, महाल परिसरातील गडकरी, काणे, गोखले, ओगले,चिटणीस,जामदार यांचे वाडे आणि संघ मुख्यालय असलेला मोहिते वाडा तसेच इतवारी परिसरातील स्वातंत्र्यसेनानी भय्याजी सहस्त्रबुद्धे यांचा वाडा असे अनेक वाडे त्याकाळी प्रसिध्द होते.

कालौघात वाडे लोप पावलेत. तिथे निवासी संकुले उभी झालीत.परंतु नितीन गडकरी सारखा कर्तृत्ववान वारस लाभल्याने इतिहास असलेला गडकरी वाडा इतर वाड्याप्रमाणे इतिहासजमा झाला नाही.तर गडकरींच्या कर्तृत्वामुळे राजकीय,सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रात त्यांचा वाडा लोकप्रिय झाला. किंबहुना सर्वसामान्य कार्यकर्त्यांसाठी हक्काचे ठिकाण बनला. पदवीधर मतदारसंघातून विधानपरिषदेचे सदस्य असल्यापासून ते शिवसेना-भाजपा युती सरकारच्या काळात सार्वजनिक बांधकाम मंत्री, पुढे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष, नागपूरचे खासदार आणि केंद्रीय मंत्री, अशी गडकरींची राजकीय वाटचाल महालातील गडकरी वाड्यातूनच झाली.

परंतु, वाड्याची वास्तू आता जीर्णावस्थेकडे वाटचाल करू लागली होती. त्यामुळे अनेक राजकीय घडामोडींचा साक्षीदार असणारा गडकरी वाडा नव्याने बांधण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे नवी इमारत उभी होईपर्यंत गडकरी कुटुंबीय रामनगरातील भक्ती बंगल्यात शिफ्ट झाले आहे. रामनगर प्रवेशद्वारासमोरील बाजीप्रभू देशपांडे यांच्या पुतळ्याकडून रविनगर चौकाकडे जाताना उजव्या बाजूला गडकरींचे नवे निवासस्थान आहे. दरम्यान 2019 पूर्वी वाड्यात परतण्याचा गडकरींचा मानस असल्याची माहिती सूत्रांनी दिली.Loading…
Loading...