मुंबई महानगरपालिकेचे 58 हजार कोटीची बँकेत एफडी, तरीही दरवर्षी मुंबई पाण्यात : नितीन गडकरी

टीम महाराष्ट्र देशा : पावसाळ्यात मुंबई तुंबणे हे काही आता नवीन राहील नाही. दरवर्षीचीचं ही बोंब असल्याने पूर हा मुंबईकरांच्या अंगवळणी पडला आहे. मात्र दरवर्षीचं ही आपत्ती येत असेल तर महापालिका तुंबापुरीच्या बाबत एवढी उदासीन का असा प्रश्न मुंबईकरांना पडला आहे. मात्र याचे उत्तर आज केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिले आहे. मुंबई महानगरपालिकेचे 58 हजार कोटी बँकेत फिक्स डिपॉझिटसाठी ठेवले आहेत. मात्र दर पावसात मुंबई पाण्यात बुडालेली दिसते, असे म्हणत गडकरी यांनी मुंबई महपलिकेला टोला लगावला आहे.

अंदमान निकोबार नंतर देशांतर्गत भागात पहिलं कांदळवन उद्यान मुंबईत तयार होणार आहे. पश्चिम उपनगरातील बोरीवली येथील गोराईत हा प्रकल्प उभा राहणार आहे. या उद्यानाचं भूमीपूजन नितीन गडकरी यांच्या हस्ते पार पडलं. यावेळी ते बोलत होते. नितीन गडकरी म्हणाले की, मुंबईचा समुद्रकिनाराही मॉरिशसप्रमाणे काचेसारखा स्वच्छ होऊ शकतो. मात्र त्यासाठी इच्छाशक्ती हवी. इटलीतील व्हेनिसप्रमाणे मुंबईत ‘वॉटर टॅक्सी’ सेवा सुरू करायला हवी, त्यातचं भविष्य आहे, असेही गडकरी, म्हणाले.

दरम्यान विदर्भातील 5 जिल्हे लवकरच डिझेलमुक्त होणार आहेत, येत्या काळात बायो सीएनजीचा वापर वाढवणार असल्याचे गडकरी म्हणाले. तसेच महाराष्ट्रातही ई रिक्षा परमिट फ्री व्हायला हवी असेही गडकरी म्हणाले.महात्मा गांधींच्या 150 व्या जयंतीनिमित्त आपण बोरीवलीच्या कोरा केंद्रातील विस्तृत जागेवर मोठ्या प्रकल्पाची सुरूवात करू. या प्रकल्पासाठी 100 कोटी रूपयांचा निधी देण्याचं आश्वासन गडकरींनी यावेळी दिले.