नितीन आगे हत्येप्रकरणी सीबीआय चौकशीसाठी पाठपुरावा करणार – विखे पाटील

नगर : नितीन आगे खून प्रकरणाचा तपास सीबीआयमार्फत करण्याच्या मागणीसाठी मुख्यमंत्र्यांकडे आपण व्यक्तीगत पाठपुरावा करू आणि आगे कुटुंबाला सरकारकडून संरक्षण मिळवून देऊ, असे आश्वासन विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या शिष्टमंडळाला आज दिली.

जामखेड तालुक्यातील खर्डा येथील नितीन आगे याची २८ एप्रिल २०१४ रोजी हत्या झाली होती. या घटनेतील आरोपींची नुकतीच निर्दोष मुक्तता झाली. साक्षीदार फितूर झाल्यामुळेच आरोपी निर्दोष सुटल्याची भावना आठवले गटाच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या कार्यकर्त्यांची आहे.

यासंदर्भात जिल्हा सरचिटणीस रमेश पारधे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांच्या एका शिष्टमंडळाने विरोधी पक्षनेते विखे पाटील यांची भेट घेऊन या घटनेचा सीबीआयमार्फत पुन्हा तपास करून आरोपींवर कडक कारवाई करण्याबाबतच्या मागणीचे निवेदन दिले. फितूर झालेल्या साक्षीदारांना सहआरोपी करावे, नितीन आगे याच्या कुटुंबाला संरक्षण द्यावे, अशी मागणीही शिष्टमंडळातील कार्यकर्त्यांनी विरोधी पक्षनेत्यांकडे केली.