मोदींनी हे ऐकून घेतलं, ते ऐकून घेतलं असं सांगून राज्याचे प्रश्न केंद्रावर ढकलण्याचा प्रयत्न – नितेश राणे

nitesh rane

मुंबई : आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आहे. या भेटीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसह अशोक चव्हाण, अजित पवार यांनी महाराष्ट्र सदनात पत्रकार परिषद घेऊन सविस्तर भाष्य केलं. तर, ठाकरे व मोदी यांची वैयक्तिक वेगळी भेट झाल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. पत्रकार परिषदेमध्ये खुद्द उद्धव ठाकरेंनी या भेटीची कबुली दिली आहे.

या नेत्यांनी मोदींकडे सविस्तरपणे राज्यातील सुमारे १२ मुद्दे मांडल्याचे पत्रकार परिषदेत सांगितलं. यात मराठा आरक्षण, राज्यपाल नियुक्त १२ आमदारांचा प्रलंबित प्रश्न, तौक्ते चक्रीवादळ मदत आदी विषयांचा समावेश आहे. पंतप्रधान मोदी यांनी देखील हे विषय गांभीर्याने ऐकले असून ते सकारात्मक निर्णय घेतील असा विश्वास उद्धव ठाकरेंनी व्यक्त केलाय. दरम्यान, जे राज्याचे विषय आहेत, ते देखील केंद्राच्या माथी मारले जात असल्याची टीका भाजप नेत्यांनी केली आहे.

या भेटीवर आता भाजप नेते नितेश राणे यांनी पंतप्रधानांची भेट घेवून हे काय करणार आहेत ? असा सवाल केला आहे. ‘मराठा आरक्षणावर पुनर्विचार याचिका राज्याला दाखल करायची आहे ! 338B नुसार मराठा समाजाचे राज्य मागासवर्गीय आयोगामार्फत सर्वेक्षण राज्याला करायचे आहे. सारथी साठी निधी राज्याला द्यायचा आहे. अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळाची सीमा राज्याला वाढवायची आहे. रखडलेल्या नियुक्त्या राज्यसरकारला द्यायच्या आहेत. मराठा समाजाच्या मुलांना फी सवलती राज्य सरकारला द्यायच्या आहेत. प्रत्येक जिल्ह्यात हॉस्टेल बांधायला निधी आणि जागा राज्य सरकारला द्यायची आहे. मग मोदींना कशासाठी भेटायचं आहे ?,’ असा सवाल नितेश राणे यांनी उपस्थित केली आहे.

यासोबतच, ‘मराठा आरक्षणाचे राजकारण थांबवा आणि काम करा , मराठा समाज आता जागृत झाला आहे. मराठा आरक्षण हा महाराष्ट्र राज्याचा प्रश्न आहे. मोदींनी हे ऐकून घेतलं मोदींनी ते ऐकून घेतलं हे म्हणून हा प्रश्न पद्धतशीरपणे केंद्रावर ढकलायचा तुम्ही प्रयत्न करताय.’ असा आरोप देखील राणेंनी केला.

पुढे ते म्हणाले, ‘तामिळनाडूत जेव्हा असाच प्रश्न निर्माण झाला होता तेव्हा जयललिता सारख्या एका बाईने मोठ्या हिंमतीने स्वतःच्या ताकदीवर हा प्रश्न निकाली काढला होता तोही यशस्वीरित्या, आता तुम्ही हा प्रश्न केंद्राच्या माथी मारून मराठ्यांच्या डोळ्यातलं पाणी पुसायचा जो प्रयत्न करताय तो केवळ आणि केवळ राजकारण करायचा एक भाग आहे.’

महत्वाच्या बातम्या