कॉंग्रेस मध्ये फुट पाडण्याचा अशोक चव्हाणांचा डाव ; नितेश राणेंनी कॉंग्रेस नेत्यांना झापले

सिंधुदुर्ग : राज्यात कॉंग्रेस जिवंत आहे की नाही माहित नाही मात्र या जिल्ह्यात राणे साहेबांनी कॉंग्रेस जिवंत ठेवली ही वस्तुस्थिती असताना सावंतवाडी मध्ये होणाऱ्या बैठकीला राणे साहेबाना का बोलावलं नाही असा सवाल उपस्थित करत आमदार नितेश राणे यांनी कॉंग्रेस नेत्यांना चांगलंच धारेवर धरले.

सावंतवाडी येथील राणी पार्वती देवी हायस्कूलच्या सभागृहात काँग्रेसचे खासदार हुसेन दलवाई, प्रदेश सरचिटणीस राजन भोसले, आमदार विश्वनाथ पाटील यांच्या उपस्थितीत आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मुख्यमंत्री आ. नारायण राणे, स्थानिक आमदार नितेश राणे, जिल्हाध्यक्ष दत्ता सामंत व कोणत्याही पदाधिका-यांना आमंत्रित केले गेले नसल्याने याबाबत जाब विचारण्यासाठी आ. नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील काँग्रेसचे सर्व पदाधिकारी या बैठकीत उपस्थित झाले.

दरम्यान, एकीकडे काँग्रेसची वाताहत झालेली असताना केवळ सिंधुदुर्ग जिल्हा परिषद जिंकून राणे साहेबांनी काँग्रेसची शान राखली. मात्र, त्यांनाच डावलण्याचा प्रयत्न होत असेल तर ते कदासिप खपवून घेतले जाणार नाही. नारायण राणे हे पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत. त्यामुळे त्यांना विश्वासात न घेता आढावा बैठक कशी काय घेतली जाते, असा रोखठोक सवाल उपस्थित करतानाच सिंधुदुर्गातील एकसंध काँग्रेसमध्ये फूट पाडण्याचाच हा वरिष्ठांचा डाव आहे, असा घणाघाती आरोप काँग्रेसचे प्रांतिक सदस्य आ. नितेश राणे यांनी केला. प्रदेश काँग्रेसकडून झालेल्या या प्रकाराचा आ. नितेश राणे यांनी तीव्र शब्दांत निषेध केला.