fbpx

निरंजन डावखरे विश्वासघातकी माणूस – राष्ट्रवादी काँग्रेस

पुणे/प्रशांत झावरे : महाराष्ट्र राज्य विधानपरिषदेचे माजी उपसभापती कै. वसंत डावखरे यांचे सुपुत्र व विधानपरिषदेचे विद्यमान आमदार निरंजन डावखरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम करून भाजपामध्ये प्रवेश केल्याचे जाहीर करून राष्ट्रवादीला धक्का दिला. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस शिवाजी गर्जे यांनी आमदार निरंजन डावखरे हेे विश्वासघातकी असल्याचे सांगून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून त्यांना ६ वर्षे निलंबित केल्याचे जाहीर केले व तसा आदेश काढला.

डावखरेंच्या या निर्णयाने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नाराजीची भावना निर्माण झाली असून, ज्या कै.वसंत डावखरे यांना पक्षाने सर्वोच्च पदे दिली अनेक वर्षे ते त्या पदांवर कार्यरत होते. पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी त्यांच्यावर विश्वास टाकला. त्यांचे सुपुत्र निरंजन डावखरे यांनाही कमी वयातच संधी देऊन विधानपरिषदेचे आमदार केले. त्यांनीच पक्षाशी गद्दारी केल्याने हा घाव राष्ट्रवादीच्या जिव्हारी लागला आहे.

राष्ट्रवादीचे नेते माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या त्रासाला व स्थानिक राजकारणाला कंटाळून आपण राष्ट्रवादी पक्ष सोडत आहे. पक्षाने आपल्याला खूप प्रेम दिले असून आपल्याला पक्ष हा कुटुंबासारखा होता, परंतु स्थानिक नेत्यांनी कायमच अनेक अडचणी निर्माण केल्याने व त्याची तक्रार करूनही आपली दखल न घेतल्याने हा आपल्यावर होणार अन्याय आहे, अनेक वर्षे पक्षाचे काम करताना आपण व आपल्या वडिलांनी पक्षासाठी अनेक खस्ता खाल्या आहेत व पक्षवाढीसाठी अनेक प्रयत्न केले आहेत, परंतु स्थानिक नेत्यांना त्याच्याशी काही देणे घेणे नाही व ते आता आपल्याला डावलण्याचा प्रयत्न करत आहेत म्हणून आपण पक्ष सोडण्याचा निर्णय घेत असल्याचे निरंजन डावखरे यांनी सांगितले होते.

दरम्यान डावखरे यांच्या घरातच अनेक वर्षे मोठी मोठी पदे होती, कमी वयातच निरंजन डावखरे यांनाही आमदार केले तरीही पक्षाने त्यांच्यावर अन्याय केले म्हणणे अत्यंत चुकीचे असून निरंजन हे पक्षावर स्वतःच्या स्वार्थासाठी आरोप करत आहेत असे गर्जे म्हणाले. स्वतःच्या स्वार्थासाठी ते भाजपला पण कधीही धोका देतील असेही गर्जे यांनी पुढे सांगितले. तसेच राष्ट्रवादी पक्षाने आमदारकी बरोबर पक्षाचे राज्यस्तरीय पद देऊन राज्य पातळीवर निरंजन डावखरे यांना नेतृत्व करण्याची संधीही राष्ट्रवादीने दिली होती. डावखरे पिता पुत्र एकाच वेळेस विधानपरिषदेचे आमदार होते याला कारण फक्त पक्षाध्यक्ष शरद पवार व राष्ट्रवादी काँग्रेसच होते.

अनेक वेळा संकटात पण डावखरे यांना पक्षाने साथ दिली तरीही पक्षाशी गद्दारी करणाऱ्या डावखरे यांना त्यांची जागा दिसल्याशिवाय राहणार नाही असे सांगून ते ज्या पक्षात जातील तिथेही विश्वासघातच करतील असे गर्जे यांनी सांगितले. एवढे सगळे पक्षाने करूनही फक्त राजकीय स्वार्थापोटी निरंजन डावखरे पक्षविरोधी कारवाया करत असल्याने ते पक्षाच्या शिस्तीत व चौकटीत बसत नसल्याने त्यांना ६ वर्षांसाठी पक्षातून निलंबित करण्यात येत असल्याचे सरचिटणीस शिवाजी गर्जे यांनी सांगितले.