निरंजन डावखरे यांना जनाधार नव्हता तर ते विधानपरिषदेपुरते मर्यादीत – जयंत पाटील

मुंबई:  निरंजन डावखरे हे जनाधार असलेले नेते आहेत असं मला वाटतं नाही. त्यांचं काम मर्यादीत विधानपरिषदेपुरतं होतं. त्यामुळे आमच्या पक्षाचं फार मोठं नुकसान झालेलं नाही अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी निरंजन डावखरे यांच्या भाजप प्रवेशावर दिली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदीचं मोठेपण विधानपरिषदेचा अर्ज भरण्याची वेळ आली त्यावेळी कळलं. ठिक आहे कधीतरी कळलं हे बरं झालं. कै. वसंतराव डावखरे हे पक्षाचे नेते होते. ते १२ वर्ष विधानपरिषदेचे उपसभापती होते आणि त्यांचे चिरंजीवही विधानपरिषदेचे आमदार होते. म्हणजे घरातील मुलगा आणि वडिल यांना एकाच सभागृहात बसवण्याचा मान पवारसाहेबांनी आणि राष्ट्रवादी काँग्रेसने दिला होता. मला वाटतं की, महाराष्ट्रातील कुठल्याच कुटुंबासाठी एवढी मदत, एवढा विचार कुठल्या पक्षाने केला नसेल. एवढी संधी काम करण्याची दिली असेल तर पक्ष बदलण्याची भावना तरुण वयात झाली असेल तर राजकीयप्रवास कोणत्या दिशेने जातोय हे लक्षात येत आहे असेही जयंत पाटील म्हणाले.

मास लिडर जे असतात ज्यांना जनाधार आहे. ते कधी पक्ष बदलण्याचा विचार सहजासहजी करत नाहीत. जनाधार नाही, कुठल्यातरी लाटेवर निवडून यायचं ठरलेले असतं, उद्दीष्ट आहे. ती माणसं पक्ष बदलत असतात. त्याने फार काही घडेल असं नाही आणि त्याने घाबरुन जायचं कारण नाही असं मला वाटतं. पक्षाला फार मोठा धक्का बसला आहे असंही नाही. अशा गोष्टी पक्षात होत असतात. विशेषत: पक्ष विरोधीपक्षात असतो त्यावेळी संधी शोधणारे प्रत्येक पक्षात असतात. ते इकडून-तिकडे करतच असतात. ज्यावेळी जनाधार असणारा माणूस जातो त्यावेळी मी याची काळजी करेन असेही जयंत पाटील म्हणाले.

आगामी चार निवडणूका विधानपरिषदेच्या आहेत. त्याठिकाणी वेगवेगळी परिस्थिती आहे. वेगवेगळी परिस्थिती असल्यामुळे काही लोकांना पक्षांतर करण्याची इच्छा व्हायला लागली आहे. आपण निवडून येणारच नाही असा न्यूनगंड त्यांचा झाला आहे. त्यांनी पक्ष बदलला तर वाईट वाटण्याचा प्रश्नच येत नाही. सहा वर्षात कामच केलं नसेल तर कसे निवडून येणार आणि भाजप हे निवडून येण्याचं यंत्र झालं आहे. कोणतंही काम किंवा विकास न करता निवडणूकीत घोषणा करणं आणि निवडून येणं हा धंदा सुरु केला आहे. साम-दाम-दंड-भेद वापरुन निवडून येणं हे भाजपच काम आहे आणि त्यामुळे दोन-चारजण इकडे-तिकडे गेले तर पक्षाला काही फरक पडत नाही असेही जयंत पाटील यांनी स्पष्ट केलं.

You might also like
Comments
Loading...