fbpx

फडणवीसांनी कामाला लागण्यास सांगितले : नीलकंठ शिवाचार्य महास्वामी

सोलापूर :  सोलापूर लोकसभेचे संभाव्य उमेदवार आणि गौडगाव मठाचे डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामींसाठी मठाधिपतींचे एक शिष्टमंडळ मुख्यमंत्री देवेंद्र  फडणवीस यांना भेटले. मुख्यमंत्र्यांनी सोलापूर लोकसभेसाठी कामाला लागण्यास सांगितले असल्याची माहिती मठाधीश परिषदेचे अध्यक्ष नीलकंठ शिवाचार्य यांनी दिली.

काँग्रेस पक्षाकडून पुन्हा एकदा माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांना उमेदवार म्हणून जाहीर करण्यात आले आहे. तसे पाहता शिंदे यांनी स्वतःच काही दिवसांपूर्वी आपणच उमेदवार असल्याचे सांगत प्रचाराला सुरुवातही केली.  मागील दिड ते दोन महिन्यात शिंदे यांनी अक्कलकोट, दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर, मंगळवेढा आदी ठिकाणच्या कार्यक्रमांना हजेरी लावत गाठीभेटींवर भर दिला आहे.

दरम्यान, सोलापूर लोकसभेसाठी अद्यापही भाजपचा उमेदवार ठरलेला नाही . विद्यमान खासदार शरद बनसोडे यांच्याबाबत प्रचंड नाराजी आहे. तर राज्यसभेचे खासदार अमर साबळे हे आयात उमेदवार असू शकतात. म्हणून, त्यांचेसुद्धा नाव मागे पडले आहे. आणि त्यानंतर होटगी मठाचे डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी यांचे नाव पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी पुढे दामटले असल्याने आणि त्यांच्यासाठी सरकारदरबारी सर्व स्तरातून फिल्डिंग लावण्यात आल्याने आता शिंदे विरुद्ध महास्वामी अशी लढत होईल असे एकूण परिस्थितीवरून दिसत आहे.

महास्वामींनी सोलापूर आणि ग्रामीण भागात बैठक घेऊन समाजबांधवांचा कानोसा घेतला आहे. शिवाय मठाधीशांनीदेखील महास्वामींच्या उमेदवारीला हिरवा कंदील दाखवला असल्याने महास्वामींची तयारी अंतिम टप्यात आली आहे. महास्वामींच्या उमेदवारीसाठी मुख्यमंत्री सकारात्मक असल्याचे सांगण्यात आले.

सुरुवातीला महास्वामींना सरकारदरबारी मुख्यमंत्री फडणवीस यांनी पाचारण करून त्यांची भूमिका जाणून घेतली होती. त्यानंतर बुधवारी सायंकाळी माजी मंत्री विनय कोरे यांच्यासह मठाधिपती यांनी महास्वामींच्या उमेदवारीसाठी मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले आहे. यावेळी परिषदेचे अध्यक्ष श्रीकंठ शिवाचार्य महास्वामी नागणसूर, निळकंठ महास्वामी मैंदर्गी, वीरपाक्ष शिवाचार्य महास्वामी जिंतूर , नंदिकेश्वर शिवाचार्य सोनपेट, शांतवीर स्वामी मादन हिप्परगा यांची यावेळी उपस्थिती होती.