‘… तर बुलडोझर घेऊन मी स्वतः तो गाळा हटवणार; त्यानंतर होणाऱ्या संघर्षाला प्रशासन जबाबदार’

nilesh rane

मालवण- मालवण शहरातील भाजी मार्केट मधील वादग्रस्त गाळा हटवण्यासाठी भाजप नेते माजी खासदार निलेश राणे यांनी पालिकेचे मुख्याधिकारी संतोष जिरगे यांना १५ दिवसांचा अल्टिमेटम दिला आहे. नगरपालिकेच्या मालकीच्या या गाळ्यामध्ये नियमानुसार पोटभाडेकरू ठेवता येत नाही. तरीपण तत्कालीन मुख्याधिकाऱ्यांनी नियम डावलून एका नगरसेवकाला बियर शॉपीसाठी हा गाळा दिला आहे. पंधरा दिवसात नगरपालिकेची नोटीस प्रक्रिया पूर्ण होऊन हा गाळा न पाडल्यास उद्या मी बुलडोजर घेऊन आलो तर मला थांबवू नका, त्यानंतर होणाऱ्या संघर्षाला प्रशासन जबाबदार असेल, असा इशारा निलेश राणे यांनी दिलाय.

या इमारती मधील सात गाळे खाली करून घेतले जातात. मग एकाच गाळयावर कृपादृष्टी का ? या प्रकारामुळे नगरपालिकेच्या कारभारावर संशय निर्माण झाल्याचे निलेश राणे म्हणाले.दरम्यान उपनगराध्यक्ष राजन वराडकर आणि भाजपा गटनेते गणेश कुशे यांनी निलेश राणे यांच्या मध्यस्थीनंतर चौथ्या दिवशी आपले उपोषण मागे घेतले.

मालवण नगरपालिकेच्या मनमानी काराभाराबाबत उपनगराध्यक्ष राजन वराडकर आणि गटनेते गणेश कुशे यांनी पालिकेसमोर बेमुदत उपोषण सुरू केले होते. आजच्या चौथ्या दिवशीही हे उपोषण सुरू होते. यात गटनेते गणेश कुशे यांची प्रकृती आज आणखीनच खालावली होती. वैद्यकीय  अधिकाऱ्यांनी त्यांच्यावर उपचार केले. या उपोषणाच्या पार्श्वभूमीवर भाजपचे प्रदेश सचिव, माजी खासदार निलेश राणे यांनी आज मालवणला भेट दिली. यावेळी त्यांनी भाजीमंडईतील त्या न पाडलेल्या गाळ्याची पाहणी केली. त्यानंतर पालिकेत मुख्याधिकारी संतोष जिरगे यांची भेट घेत चर्चा केली.

यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिस बंदोबस्त तसेच दंगल नियंत्रण पथक पालिकेत तसेच पालिका परिसरात तैनात करण्यात आले होते.  मुख्याधिकाऱ्यांशी झालेल्या चर्चेत भाजीमंडईच्या स्ट्रक्चरल ऑडीट इमारत धोकादायक असल्याचे म्हटले होते. या ऑडीटनुसार सर्व गाळे हटविणे आवश्यक असताना एक गाळा अद्यापही हटविण्यात आलेला नाही. ऑडीटमध्ये हा गाळा स्वतंत्र आहे असा कोणताही उल्लेख नसल्याचे पालिकेच्या अभियंत्यांनी स्पष्ट केले आहे. त्याचबरोबर प्रत्यक्षात गाळेधारकाला पोट भाडेकरू ठेवण्याचा करारात उल्लेख नसतानाही बेकायदेशीररीत्या पोट भाडेकरू ठेवण्यात आला आहे. त्यामुळे संबंधितास पोट भाडेकरू सात दिवसात हटविण्याची नोटीस बजावण्यात यावी. त्याचबरोबर जसे सात गाळे हटविले तसेच तो गाळाही पंधरा दिवसाच्या आत हटविण्याची कार्यवाही करा असे   राणे यांनी मुख्याधिकाऱ्यांना सांगितले.

हा गाळा येत्या पंधरा दिवसात हटविण्याची कार्यवाही न झाल्यास बुलडोझर घेऊन तो गाळा पाडायला जाईन, असा इशारा निलेश राणे यांनी दिला. या चर्चेनंतर पोट भाडेकरूला काढण्याबाबतची सात दिवसाची नोटीस आजच देऊ तसेच अन्य मागण्यांबाबतचा अहवाल येत्या दोन दिवसात जिल्हाधिकाऱ्यांना सादर करू असे आश्वासन जिरगे यांनी राणे यांना दिले.

निलेश राणे यांच्या यशस्वी शिष्टाईनंतर वराडकर, कुशे यांनी चार दिवस सुरू असलेले आमरण उपोषण मागे घेतले. गणेश कुशे यांनी याबाबत घोषणा केली.यानंतर पत्रकारांशी बोलताना निलेश राणे यांनी भाजीमंडईतील जो गाळा अद्याप हटविलेला नाही तो गाळा शिवसेनेच्या एका नगरसेवकाने चालवायला घेतला आहे. तिकडे तो अगरबत्ती नाही तर दारू विकत आहे. सत्तेचा गैरवापर करण्याचे काम मालवणात सुरू आहे. त्यामुळेच उपनगराध्यक्षांना उपोषणाला बसावे लागत आहे. शिवसेनेची मंडळी ही दोन नंबरची असल्याने त्यांच्या कृपाशिर्वादाने हे सर्व प्रकार चालले आहेत. आता सामंजस्याने घेतले. दुसऱ्यांदा  येईन तेव्हा हा गाळा हटविलेला नसेल तर उग्र आंदोलन उभारले जाईल त्यामुळे याची योग्य ती दखल घेण्याची सूचना पोलिस व पालिका प्रशासनाला केल्याचे ते म्हणाले.

यावेळी भाजपचे जिल्हा सरचिटणीस अशोक सावंत, बाबा परब, आनंद शिरवलकर, तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, सभापती अजिंक्य पाताडे, उपसभापती राजू परुळेकर, जिल्हा परिषदेचे वित्त व बांधकाम सभापती महेंद्र चव्हाण, महेश मांजरेकर, विजय केनवडेकर, भाऊ सामंत, आबा हडकर, भाई मांजरेकर, यांच्यासह भाजपचे अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

महत्त्वाच्या बातम्या :