काही ठिकाणी सेनेचे गुंड उमेदवाराना दमदाटी व धमकी देत आहेत; निलेश राणेंचा आरोप

nilesh rane

रायपाटण : मराठी माणसाच्या जीवावर मुंबई अणि कोकणात शिवसेनेने राजकारण करत शिवसेनेने कायमच आपला स्वार्थ साधला आहे. मात्र मराठी माणूस मुंबईतुन हद्दपार होत असून शिवसेनेला त्याच काही देणंघेणं नाही. आज मुंबईत परप्रांतीय बावीस टक्के आणि मराठी माणूस अठरा टक्के अशी परिस्थिती आहे. कोरोनाच्या संकटात मुंबईत कोकणी माणूस मरणयातना भोगत होता त्यावेळी शिवसेनेचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे मातोश्रीच्या बाहेर पडले सुद्धा नाहीत. ही अत्यंत लाजिरवाणी बाब आहे. मुख्यमंत्र्यांना राज्य चालवता येत नाही. राजापूरचे आमदार राजन साळवी हे निष्क्रिय आमदार असून त्यांचे पक्षात वजनच नाही. त्यामुळे हे भिकारी ठाकरे सरकार जनतेला काहीच मदत करू शकणार शकत नाही अशी खरमरीत टिका भाजपचे नेते, माजी खासदार निलेश राणे यांनी केली आहे.

ग्रामपंचायत निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर राजापूर तालुक्यातील रायपाटण- कदमवाडी या गावात गावभेटी घेऊन उमेदवार, प्रतिष्ठित ग्रामस्थ यांना निवडणूक अनुषंगाने मार्गदर्शन व सूचना यावेळी राणें यांनी दिल्या. यावेळी तिथल्या ग्रामस्थांनी रस्ते, वीज, पाणी, आरोग्य यांसारख्या सुविधा उपलब्ध नसल्याचे यावेळी सांगितले.

याप्रसंगी बोलताना राणें म्हणाले की, रायपाटण मधील अजुर्ना नदी पुलाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी मी तत्कालीन सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांना भेटलो त्यावेळी चंद्रकांतदादा यांनी लगेच निधी उपलब्ध करून दिला. म्हणून आज पुलाचा प्रश्न मार्गी लागला आहे. मात्र इथला स्थानिक आमदार राजन साळवी पुलाचा प्रश्न मार्गी लावता आला नाही. आ. साळवींना मंत्रालयात शिपाई सुद्धा विचारतात कोण तुम्ही? शिवसेनेत त्यांना कोणतेही स्थान नाही. ते पुढे म्हणाले की, आ. साळवी यांनी आपल्या मतदारसंघात पाहिजे तशी विकास कामे केली नाहीत. जनतेची फसवणूक केली.

शिवसेनेचे आमदार, खासदार, पालकमंत्री यांनी राजापूरलाच नव्हे तर रत्नागिरी जिल्ह्याला मागास ठेवले आहे. तिकडे सिंधुदुर्ग आणि रायगड जिल्हा झपाट्याने विकासकामे होत आहेत. तर मग रत्नागिरी जिल्ह्यात का नाही होत? नारायण राणे साहेबानी सिंधुदुर्ग जिल्ह्यात साडेसहाशे बेडच हॉस्पिटल उभ केलं. मग रत्नागिरी जिल्ह्यात सेनेच्या लोकप्रतिनिधीनी एक तरी बालवाडी तरी बांधून दाखविली का? असा सवाल राणें यांनी उपस्थित केला.

राणे साहेब कॅबिनेटमध्ये असताना कोकणातल्या भात शेतीना भाव मिळावा म्हणून हक्काने लढताना दिसायचे. मात्र आताचे सेनेचे आमदार, खासदार, पालकमंत्री सभागृहात कोकणच्या विकासाबाबत भांडताना दिसत नाहीत. रत्नागिरिचा पालकमंत्री कोण? हे देखील जिल्ह्याला माहिती नाही. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये कोरोनाच्या संकटात महिलांच्या बचत खात्यात पैसे देणे, किसान सन्मान योजनेतुन शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये देणे हे सर्व सुविधा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकार करत आहे. राज्यातील या पणवती ठाकरे सरकारने जिल्ह्याला कवडीची देखील मदत केली नाही. जिल्ह्याचे पालकमंत्री यांच काम काय तर मातोश्रीवर वॉचमनची ड्युटी करणे असा घणाघातही राणे यांनी केला. जिल्हा परिषद दिवाळखोरीत गेली मात्र सेनेच्या लोकप्रतिनिधीना काहीच देणंघेणं राहील नाही. ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसेनेच्या विरोधात लाट निर्माण झाली आहे. तसेच शिवसेनेच्या नेत्याना आता जनताच शिव्या घालत आहे. पश्चिम महाराष्ट्रात आठ पदरी रस्ते झाले मात्र रत्नागिरी जिल्ह्यात चौपदरी रस्ते का नाही होत? असा प्रश्न देखील राणे यांनी उपस्थित केला.

रायपाटण ग्रामपंचायत निवडणूकित भाजपचा झेंडा फडकलाच पाहिजे. रत्नागिरी जिल्ह्यात भाजपमय वातावरण आहे. सेनेच्या विरोधात जनतेत चीड निर्माण झाली आहे. आता काही ठिकाणी सेनेचे गुंड उमेदवाराना दमदाटी व धमकी देत आहेत. मात्र अश्या पोकळ धमक्यांना कुणी भीक घालू नका. तुमच्या पाठीशी हा निलेश राणे ठामपणे उभा आहे. त्यांचा जागीच बंदोबस्त केला जाईल असे राणे यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले की, शिवसेनेने नेहमीच ग्रामपंचायतीत भ्रष्टाचार करण्याचे काम केले. शौचालयाचा निधी वाटप, ग्रामीण भागातील पाखड्या बांधणे, रस्ते असोत यामध्ये टक्केवारी खाण्याचे काम हा शिवसेनेचा एकमेव कार्यक्रम आहे. भविष्यात ग्रामीण भागातील विकासकामांना अधिक गती द्यायची असेल तर भाजपची सत्ता ग्रामपंचायतीवर आणा असे आवाहन राणें यांनी केले.

महत्वाच्या बातम्या