‘संजय राऊत बोलले नाहीत तर त्यांना पगार मिळेल का ?’

‘संजय राऊत बोलले नाहीत तर त्यांना पगार मिळेल का ?’

thackeray-raut

जळगाव : मराठा समाजाला आरक्षण देण्याचे ठाकरे सरकारच्या मनात कधीच नव्हते. जाणून बुजून ठाकरे सरकारने सुप्रीम कोर्टात तांत्रिक बाजू मांडल्याच नाहीत. जे मराठा आरक्षण भाजपाच्या फडणवीस सरकारने पाच वर्षे टिकवले, ते बिघडविण्याचे काम ठाकरे सरकारने केल्याचा आरोप भाजपचे महाराष्ट्र प्रदेश सचिव निलेश राणे यांनी आज जळगावात एका पत्रकार परिषदेत केला. मराठा समाजाला एकत्र करून त्यांचे तीव्र आंदोलन भाजपाच्या माध्यमातून उभे करणार असल्याचा इशारा देखील यावेळी राणे यांनी दिला.

जळगाव दौऱ्यावर आलेल्या निलेश राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन मराठा आरक्षण प्रश्नी भूमिका मांडली. यावेळी त्यांच्यासोबत भाजप जिल्हाध्यक्ष आमदार सुरेश भोळे, आमदार मंगेश चव्हाण, आमदार चंदू पटेल उपस्थित होते. यावेळी निलेश राणे यांनी सांगितले की, मराठा आरक्षणाचा घोळ ठाकरे सरकारने केला आहे आणि आरोप केंद्र सरकारवर करीत आहेत. त्यांना हा विषयच समजलेला नाही. ठाकरे सरकारमध्ये या विषयाचा अभ्यास करणारा एकही व्यक्ती नाही. सुप्रीम कोर्टात आवश्यक असलेले संदर्भ, नोंदी सादर केल्याच नसल्याने आरक्षण टिकले नाही. अशोक चव्हाण या समितीमध्ये असल्याने आम्हाला खात्री होतीच की आरक्षण टिकणार नाही, नाकारले जाणार आणि तसेच झाले. हे जाणून बुजून केले गेले याबाबत माझ्या मनात शंकाच नाही अशा शब्दात निलेश राणे यांनी राज्य सरकारवर आरोप केलेत.

मागास आयोग स्थापन करून मागासलेपणा सिद्ध करावा लागेल हेच ठाकरे सरकारला महिन्यापर्यंत माहीत नव्हते. केंद्राकडे बोट दाखविले जात असले तरी या बाबी राज्य सरकारने पूर्ण केल्या पाहिजे होत्या पण उद्धव ठाकरे आणि अजित पवार यांना यात रस आहे, असे वाटत नाही, या सर्व कारणांमुळेच मराठा आरक्षणाचा विषय अडकला आहे. हातात कागद न घेता मुख्यमंत्री ठाकरे यांना यातील एक मुद्दा देखील सांगता येणार नसल्याची टीकाही यावेळी निलेश राणे यांनी केली.

…म्हणून संजय राऊत बोलतात
निलेश राणे यांनी यावेळी खासदार संजय राऊत यांच्यावरही टीका केली. बिनकामाचे संजय राऊत दररोज सकाळी विषय वळविण्याचे काम करतात.संजय राऊत बोलले नाहीत तर त्यांना पगार  मिळेल का ?  कोण संजय राऊत ? ते ठाकरे यांच्या पगारावर आहेत, त्यांना बोलणे भागच आहे. त्यांनी महाराष्टासाठी काय केले? मराठा समाजाचा अपमान करण्याचे काम राऊत यांनी केले. मात्र, अद्याप माफी मागितलेली नाही, तो हीशोब आम्ही नतंर करू असा इशाराही निलेश राणे यांनी दिला.

तीव्र आंदोलनाचा इशारा
मराठा समाजाला कुठे जावे ते कळत नाही. हात पसरून झालेत. आंदोलने करून झालीत. आता ठाकरे सरकार तीव्र आंदोलनाची वाट पाहात आहे. एक दिवस मराठा समाज घरात घुसून आपला हक्क घेईल, असा इशारा देखील निलेश राणे यांनी दिला. भाजपच्या माध्यमातून मराठा समाजाला एकत्र करून एक तीव्र आंदोलन उभारण्याचे काम सुरू आहे. लवकरच आंदोलनाची दिशा ठरविणार असल्याचेही राणे यांनी सांगितले. संभाजीराजे छत्रपती हे भाजपाचे खासदार आहेत. मात्र, त्यांनी मराठा आरक्षणाच्या आंदोलनाबाबत ठरविलेली तारीख ही पक्षाला विचारून ठरविलेली नाही. त्यामुळे त्यांना पाठिंबा द्यावा की नाही, हा निर्णय पक्ष घेईल, अशी माहिती राणे यांनी दिली. राज्य सरकारने आतापर्यंत काय केले? असे प्रश्न राजेंनी ठाकरे सरकारला विचारावे असेही ते म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या