fbpx

निलेश लंके , सुजय विखे माझ्या संपर्कात ; जानकरांचा गौप्यस्फोट

टीम महाराष्ट्र देशा : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी आम्ही भाजपकडे पाच जागांची मागणी केली आहे. जर लोकसभेसाठी सेना-भाजपा युती झाली तर दोन जागांचा प्रस्ताव दिलेला असून, नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाच्या जागेसाठी आग्रही राहणार असल्याचे पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले. दरम्यान, जिल्ह्यातील डॉ. सुजय विखे, निलेश लंके आमच्या संपर्कात असल्याचा गौप्यस्फोटही त्यांनी यावेळी केला. मात्र, पुढे बोलतांना त्यांनी आत्ताच कुणाची नावे जाहीर केल्यास अडचणी निर्माण होतील, असे सांगत अनेक मोठे नेते संपर्कात असल्याची सारवासारव केली.

महादेव जानकर म्हणाले की, लोकसभा निवडणुकीसाठी आम्ही एनडीए सोबतच राहणार आहोत. सर्वांनी एकत्र राहावे, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. लोकसभा निवडणुकीसाठी आम्ही पाच जागांची मागणी केली असून युती झाली तर आम्हाला दोन जागा मिळाव्यात, अशी आमची माफक अपेक्षा आहे. लोकसभेसाठी मी स्वतः निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचे सांगत मला बारामतीबद्दल विशेष प्रेम असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. मात्र, भाजप निवडणूक स्वतंत्र लढली, तर नगर दक्षिण मतदारसंघाची जागा आम्हाला मिळावी, यासाठी आग्रही राहणार असून मी स्वतःही या ठिकाणी उभे राहू शकतो, असे सूचक वक्तव्यही जानकर यांनी यावेळी केले.