सत्तेची धुंदी उतरविल्याशिवाय शांत बसणार नाही : निलेश लंके

आमदार विजय औटी यांच्याविरोधात निलेश लंके आक्रमक

पारनेर/प्रशांत झावरे पाटील  :- लोकप्रतिनिधींच्या डोळ्यावर आलेली सत्तेची धुंदी तालुक्यातील जनतेच्या आशीर्वादाने व पाठिंब्याने उतरविल्याशिवाय शांत बसणार नाही आणि सर्वसामान्य जनतेला केंद्रस्थानी ठेवून तालुक्यातील प्रत्येक गावातील प्रत्येक घटकांच्या प्रगतीसाठी व उन्नतीसाठी प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन पारनेर तालुक्यातील निलेश लंके प्रतिष्ठान गारगुंडी येथील शाखेच्या उद्घाटन प्रसंगी लोकनेते निलेशजी लंके यांनी केले.

निलेश लंके यांनी आपल्या मनोगतामधून प्रतिष्ठान तालुक्यात राबवित असलेल्या लोककल्याणकारी योजनांची माहिती देऊन पुढील काळात समाजहितासाठी अनेक योजना राबवणार असल्याचे सांगितले. तसेच कटकारस्थान करून मला संपावणार्यांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेतला असून २०१९ ला तालुक्यातील जनता त्यांना त्यांची जागा दाखवून देणार असल्याचा ठाम विश्वास लंके यांनी व्यक्त केला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ठाणे जिल्हा शिक्षक सेनेचे अध्यक्ष सुनील फापाळे हे होते. यावेळी निलेश लंके प्रतिष्ठान पारनेरचे अध्यक्ष बापूशेठ शिर्के, उपाध्यक्ष ठकाराम लंके, राजुशेठ चौधरी, अनिल गंधाक्ते, गोपीनाथ घुले, संदीप मगर, पोपट गुंड, विजय औटी, प्रदीप गावडे, ठाणे पालघर शिक्षक बँकेचे अध्यक्ष बाबाजी फापाळे, गारगुंडीच्या सरपंच हिराबाई झावरे, उपसरपंच गुलनाज शेख, माजी सरपंच अंकुश झावरे, झुंबरबाई ठुबे, चेअरमन सोपान झावरे, प्रतिष्ठानचे गारगुंडी अध्यक्ष बाळासाहेब ठुबे, उपाध्यक्ष दीपक खोसे, हरिश झावरे, अरुण झावरे, सागर ठुबे, रोहित झावरे, निवृत्ती झावरे, बाबासाहेब आमले यांसह ग्रामस्थ व तालुक्यातील अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

यापुढे कोणालाही न घाबरता व कोणाच्याही दहशतीला न घाबरता सर्वसामान्यांनी आता लढायला शिकले पाहिजे असेही लंके म्हणाले. कार्यसम्राट म्हणणाऱ्यांना आत्ताच तालुक्यातील जनतेचा पुळका आला असून त्यांना आताशी जनतेचे सुख दुःख कळायला लागले आहे, विकास म्हणजे फक्त रस्ते, सभामंडप करणे नसून सर्वसामान्य व तळागाळातील जनतेला आपलं समजून त्यांचं प्रत्येक काम मार्गी लावण्याबरोबर त्यांच्या सुखाबरोबरच दुःखात पण आधार देणे गरजेचे आहे आणि त्यांना अडीअडचणीच्या वेळी साथ देणे गरजेचे आहे असा उपरोधिक टोला लंके यांनी आमदार विजय औटी यांचे नाव न घेता हाणला.

आपल्याला शिवसेनेतून जरी काढले असले तरी यापुढील काळातसुद्धा आपण शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या शिकवणीप्रमाणे काम करणार असून तुकाराम महाराजांच्या वचनाप्रमाणे ‘भले देऊ कासेची लंगोटी, पण नाठाळाच्या माथी हाणू काठी’आशा प्रकारे काम करणार असल्याचे लंके म्हणाले. दुसऱ्याला पक्षनिष्ठा शिकविण्यापेक्षा स्वतः शिवसेनेशी किती निष्ठावान आहेत हे तपासून पहा आणि याचे उत्तर येत्या काळात जनतेच्या आशीर्वादाने व पाठिंब्याने देणार असल्याचे ठाम प्रतिपादन लंके यांनी केले.

अध्यक्षीय भाषणात सुनील फापाळे यांनी आपण व गारगुंडी गाव निलेश लंके यांच्या पाठीमागे तन, मन, धनाने उभे राहणार असल्याचे सांगुन, सच्चा शिवसैनिक कधीही हार मानत नसून त्याचप्रमाणे निलेश लंके काम करत आहेत आणि करत राहतील व त्याची पावती येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत मिळणार असून पारनेर तालुक्याचे भावी आमदार निलेश लंकेच होतील असा विश्वास फापाळे यांनी व्यक्त केला. यावेळी ठकाराम लंके, विजय औटी, पोपट गुंड, प्रदीप गावडे, दीपक खोसे, अंकुश झावरे यांनीही मनोगत व्यक्त केले, प्रास्तविक बाबाजी फापाळे, सूत्रसंचालन बाबासाहेब आमले यांनी केले, आभार बापू शिर्के यांनी मानले.

You might also like
Comments
Loading...