‘ऊसतोडीवर जाणाऱ्या महिलांसाठी चांगल्या वैद्यकीय सुविधांसाठी उपाययोजना करण्याची गरज’

गेवराई : रुग्णालय स्तरावर निरीक्षण आणि नियंत्रण प्रणाली विकसित होणं आवश्यक असल्याचं, विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोऱ्हे यांनी म्हटलं आहे. बीड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर गर्भाशय शस्त्रक्रियांच्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर, त्यांनी काल गेवराई इथं चार सदस्यीय चौकशी समिती सह उपजिल्हा रुग्णालयाला भेट दिली, त्यानंतर बोलत होत्या. ऊसतोडीवर जाणाऱ्या महिला कामगारांबाबत चांगल्या वैद्यकीय सुविधांसाठी उपाययोजना करण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली. ग्रामीण महिलांच्या आरोग्यात सुधारणा होण्यासाठी महिलांबरोबरच पुरुषांमध्ये जागृती व्हायला हवी, असंही गोऱ्हे यांनी नमूद केलं.

आपल्या दोन दिवसांच्या दौऱ्यात डॉ. गोऱ्हे आज संबंधित अधिकाऱ्यांसमवेत बीड इथं एक बैठकही घेणार आहेत. वंजारवाडी इथल्या पीडित महिलांशी तसंच आशा आणि अंगणवाडी कार्यकर्त्यांशी त्या आज संवाद साधणार आहेत. साखर कारखाना संचालक, मुकादम संघटना प्रतिनिधी तसंच अशासकीय संस्थाच्या प्रतिनिधींबरोबरही त्या चर्चा करणार आहेत.