विखे-पाटील किटकनाशकासारखे- निलम गो-हे

नागपूर : तुम्हाला आणि तुमच्या पिताश्रींना शिवसेनेमुळे मंत्रिपदे मिळाली असताना त्याच शिवसेनेवर टीका करणे म्हणजे खालच्या स्तराचे राजकारण होय. त्यामुळे टीका करणारे विखे-पाटील हे विषारी किटकनाशकाप्रमाणे असल्याचे टीकास्त्र आ. निलम गो-हे यांनी सोडले आहे.

विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी उद्धव ठाकरेंवरकेलेल्या टीकेचा समाचार घेताना त्या बोलत होत्या. यावेळी डॉ. गो-हे म्हणाल्या की, पुणतांब्यातील शेतकरी संप फोडणा-या विखे पाटलांना जनताच धडा शिकवेल. त्यांना शेतक-यांबद्दल बोलण्याचा अधिकार नाही. त्यांच्या पक्षातील रोडावत चाललेली आमदारांची संख्या पाहुन त्यांना नैराश्य आले असून याच वैफल्यातून ते बोलत सुटले आहेत.

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेची अंमलबजावणी सुयोग्यरीत्या झाली पाहिजे, याचा आग्रह शिवसेनेने पूर्वीपासूनच धरला आहे. त्यामुळे राज्यातील शेतक-यांचा शिवसेनेवरील विश्वास वाढला आहे. वेळोवेळी शिवसेनेने मांडलेली आश्वासक व मदतीची भूमिका ही जनतेच्या विश्वासाला तडा जाऊ नये यामुळे केल्या जाणा-या सर्वसमावेशक प्रयत्नांतून एकंदर राज्यातच सेनेची परिणामकारकता वाढताना दिसत आहे. विरोधी पक्षातील काही जण मात्र विनाकारणच राज्य सरकारमधून कोण कधी बाहेर पडेल, यासाठी आशाळभूतपणे पाहत असल्याचा टोलाही गो-हे यांनी लगावला.