निखिल वागळे…१९ वर्ष वयाचा संपादक ते TV ९ एक ‘सडेतोड’ प्रवास 

why Nikhil Wagle TV 9 Marathi sadetod Program was closed

महाराष्ट्र देशा स्पेशल : महाराष्ट्राला पत्रकारितातेचा वारसा तसा खूप जुना या मराठी मातीत अनेक थोर पत्रकारांनी जन्म घेतला . पण या सगळ्यात आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आणि सवाल न पडणाऱ्या वंचिताला ‘आजचा सवाल’ विचारायला शिकवले असे निखिल वागळे…  महाराष्ट्र मध्ये असा व्यक्ती शोधून सापडणार नाही जो निखिल वागळे यांना ओळखत नाही. २३ एप्रिल १९५९ ला जन्मलेले निखिल वागळे यांनी आपली पत्रकारिता १९७७ मध्ये सुरु केली त्यांनंतर त्यांनी मुंबई मध्ये दिनांक या साप्ताहिक मध्ये काम करण्यास सुरवात केली . १९७९ मध्ये दिनांकच्या संपादकाने राजीनामा दिल्यानंतर अवघ्या १९ वर्षीय निखिल वागळे यांना प्रकाशकाने मुख्य संपादक पदावर नियुक्त केले . नंतर निखिल वागळे हे पुण्याला आले आणि किर्लोस्कर समूहात सहभागी झाले , त्यावेळी किर्लोस्कर ग्रुप मासिके चालवत होते . पण त्यावेळी वागळे यांनी एका महिन्याच्या आतमध्येच ती नोकरी सोडली आणि मुंबई ला परतले .
१९८२ मध्ये त्यांनी स्वतःचे प्रकाशन गृह स्थापन करून अक्षर नावाचे मासिक सुरु केले . १९८३ मध्ये त्यांनी ‘षटकार’ नावाचं स्पोर्ट्स मॅक्झीन सुरु केले त्यावेळी त्याचे संपादक संदीप पाटील होते. या स्पोर्ट्स मॅक्झीन नंतर निखिल वागळे  यांनी फिल्म मॅक्झीन ‘चंदेरी’ सुरु केले त्याच्या पहिल्या संपादिका रोहिणी हट्टंगडी आणि नंतर गौतम राजाध्यक्ष हे होते .
निखिल वागळे यांची नवी इनींग सुरु झाली ती १९९० मध्ये महानगर या हिंदी आणि मराठी वृत्तपत्रापासून , या वृत्तपत्राच्या  ( आपल महानगर ) मराठी आवृत्तीचे ते संपादक होते. राजकीय समीक्षक म्हणून निखिल वागळे  यांचे परखड लेखन त्यावेळच्या शिवसेना आणि शिवसेना प्रमुखांना चांगलंच झोंबत असे, त्यामुळेच शिवसैनिकांनी निखिल वागळे  यांच्या कार्यलयावर आणि त्यांच्यावर देखील शिवसेना स्टाईल ने आक्रमण केले होते .
१९९४ मध्ये महाराष्ट्र विधिमंडळातील आमदारांनी गुन्हेगारी पार्श्ववभूमी असलेल्या लोकांना श्रद्धांजली दिल्याबाबदल आपल्या खास सडेतोड भाषेत टीका केली होती , त्यावेळी वागळे  यांच्यावर माफी मागण्यासाठी दबाव वाढत होता . पण झुकेल तो निखिल वागळे कसला ? सत्तेच्या तख्ता समोर झुकण्यापेक्षा या बहाद्दराने १ आठवडा जेल ची हवा खाणे पसंत केले .
२००४ मध्ये पुन्हा एकदा त्यावेळचे कट्टर शिवसैनिक नारायण राणे यांच्या वरील वक्तव्यामुळे निखिल वागळे यांच्यावर शिवसैनीकांनी हल्ला केला आणि यावेळी त्यांच्या तोंडाला काळे देखील फासले होते. वागळे  यांनी प्रकाशक म्हणून ८० हून  अधिक पुस्तकांची निर्मिती केली आहे . निखिल वागळे यांचा टीव्ही वरील वावर तसा १९८९ मधेच सुरु झाला होता त्यांनी दूरदर्शन मधून आपल्या एक सामाजिक – राजकीय विश्लेषक म्हणून ठसा उमटवला होता. ते आमने – सामने या कार्यक्रमाचे अँकर देखील होते .
२००० साली निखिल वागळे हे नेटवर्क १८ च्या IBN लोकमत या चॅनलचे संपादक झाले आणि महाराष्ट्राला मिळाला एक सच्चा पत्रकार , २००० ते २०१४ पर्यंत निखिल वागळे  यांनी चॅनेल च्या माध्यमातून महाराष्ट्रातील अनेक वादग्रस्त मुद्द्यांना हात घातला. या दरम्यान त्यांचा ‘आजचा सवाल’ हा डिबेट शो त्यांच्या आक्रमक पणामुळे चांगलाच चर्चेत राहिला पण त्यांची ही आक्रमकता कधी कधी उद्धट रूप धारण करते असा आरोप सुद्धा त्यांच्यावर होत राहिला . याच दरम्यान मान्यवरांशी दिलखुलास गप्पांचा आणि थेट प्रश्नाचा त्यांचा ‘ग्रेट भेट’ हा शो सुद्धा खूप गाजत होता . २०१४ मध्ये लोकसभा निवडणुकीनंतर निखिल वागळे यांनी IBN लोकमत चा राजीनामा दिला ( हा राजीनामा दिला की द्यायला भाग पाडलं ? )  IBN लोकमत च्या संपादकीय टीमचा भाग म्हणून संस्कृती पुरस्कार देखील त्यांना मिळाला .
IBN लोकमत सोडल्यानंतर निखिल वागळे हे महाराष्ट्र १ या चॅनलचे संपादक झाले . त्यांचा ट्रेडमार्क असलेला आजचा सवाल हा शो त्यांनी इथेही सुरु ठेवला. या दरम्यान सनातन चे अभय वर्तक यांना चालू शो मधून हाकलवून दिल्याने निखिल वागळे पुन्हा चर्चेत आले होते. पण या वादानंतर निखिल वागळे यांनी नोव्हेंबर २०१६ मध्ये महाराष्ट्र १ ला सुद्धा रामराम ठोकला त्यांनंतर १ मे २०१७ पासून निखिल वागळेंचा ‘सडेतोड’ प्रवास सुरु झाला तो TV ९ वर पण आज ( २० जुलै ) असं काय झालं की याचं अचानक TV ९  ने ‘सडेतोड’ हा शो बंद केला .

पुरोगामित्वाचा बडगा मिरवणाऱ्या महाराष्ट्रात आज एका पत्रकाराचा सच्चा आवाज दाबण्याचा प्रयत्न होत असताना वेळ आहे जो सामन्यांसाठी आवाज उठवतो अशा साथी ची साथ देण्याची आणि आवाज उठवण्याची .